Home >> गोवा >> नागरिक वार्ता : वेळुस-सातोडे रस्त्यावर खड्ड्यांचा धोका

नागरिक वार्ता : वेळुस-सातोडे रस्त्यावर खड्ड्यांचा धोका

भूमिगत वीज केबलच्या कामानंतर रस्ता धोकादायक, दुरुस्तीची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
नागरिक वार्ता : वेळुस-सातोडे रस्त्यावर खड्ड्यांचा धोका

वाळपई : सत्तरी तालुक्यातील वेळुस-सातोडे मार्गावर भूमिगत वीज केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी एक ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

उन्हाळ्यात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी रस्त्याच्या एका बाजूला दोन ते तीन ठिकाणी एक ते दोन फूट खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांचा आकार आणखी वाढला असून रस्ता अधिक धोकादायक बनला आहे.

वेळुस-सातोडे हा रस्ता आधीपासूनच अरुंद असल्याने समोरून वाहन आल्यास बाजू देताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, शालेय बस, रुग्णवाहिका तसेच मालवाहू वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून प्रथमच येणाऱ्या किंवा परिसराची माहिती नसलेल्या वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसून येत नसल्याने वाहन रुतणे, घसरणे किंवा अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. भूमिगत वीज केबलच्या कामानंतर योग्य दर्जाने भराव व डांबरीकरण न झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अशा सर्व ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित वीज खात्याने तातडीने या ठिकाणाची पाहणी करून खड्डे बुजवावेत, रस्त्याचे मजबुतीकरण करावे आणि भविष्यात अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा