Home >> गुन्हे >> बर्च क्लबविरुद्धचा मनी लाँड्रिंग खटला सुरू; म्हापसा विशेष न्यायालयाकडून संशयितांना नोटीस

बर्च क्लबविरुद्धचा मनी लाँड्रिंग खटला सुरू; म्हापसा विशेष न्यायालयाकडून संशयितांना नोटीस

३० ते ३५ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा ईडीचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
बर्च क्लबविरुद्धचा मनी लाँड्रिंग खटला सुरू; म्हापसा विशेष न्यायालयाकडून संशयितांना नोटीस

म्हापसा : हडफडे येथील बर्च नाईट क्लबची मूळ कंपनी आणि तिच्या मालकांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) दाखल केलेल्या खटल्याची पहिली सुनावणी म्हापसा येथील विशेष न्यायालयात गुरुवारी ९ रोजी झाली.
न्यायालयाने सौरभ लुथरा, गौरव लुथरा, अजय गुप्ता, सुरिंदर कुमार खोसला आणि मेसर्स बीइंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे एलएलपी, यांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने प्रकरणाची दखल घेण्यापूर्वी (प्री -कॉग्निझन्स) सर्व आरोपींना नोटीस जारी केली.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या आस्थापनेच्या कथित बेकायदेशीर कामकाजाबाबत बर्च नाईट क्लबची मूळ कंपनी असलेल्या बीइंग जीएस हॉस्पिटॅलिटी हडफडे गोवा एलएलपी विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी म्हापसा येथील विशेष न्यायालयात झाली.
सुनावणीवेळी अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. सिद्धार्थ सामंत उपस्थित होते. न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आणि पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी निश्चित केली. अॅड. सामंत यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सखोल तपास केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगची तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये आम्हाला ३० ते ३५ कोटी रुपयांची गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम (प्रोसीड्स ऑफ क्राईम) आढळून आली आहे.

१८ ऑगस्टला आरोपींना हजर राहण्याचे निर्देश
सरकारी पक्षाचा प्राथमिक युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना नोटीस बजावली असून, त्यांना १८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दिवशी प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय पुढील प्रक्रिया निश्चित करणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा