यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट; कच्च्या मालाचे दर ३० टक्के वाढले

सणासुदीच्या काळात कच्चा माल, इंधन आणि अन्नधान्य महागल्याने गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले आहे. गोव्यात नोंदणीकृत ४६६ व्यावसायिकांमार्फत ८१ हजारांहून अधिक गणेशमूर्ती उपलब्ध असून, यात स्थानिक कलावंत आणि आयातदार समाविष्ट आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
18 mins ago
यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट; कच्च्या मालाचे दर ३० टक्के वाढले

पणजी : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना संपूर्ण राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु झाली आहे. गणेशमूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये सध्या मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याचे आणि रंगकामाचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, यंदाच्या या आनंदाच्या वातावरणावर महागाईचे गडद सावट पाहायला मिळत आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, इंधनाचे भडकलेले दर आणि कुशल कारागिरांची वाढलेली मजुरी या त्रिसूत्रीमुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या दरांमुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या अर्थकारणाचे बजेट कोलमडले आहे.


Goa's artisans gear up for Chaturthi by sculpting traditional clay idols  |Gomantak Times


मूर्तींच्या निर्मितीसाठी लागणारी शाडू माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी), फायबर, रंग, लोखंडी सांगाडे आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याचे चित्रशाळा चालकांचे म्हणणे आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची झळ ग्राहकांना स्पष्टपणे जाणवणारी आहे. गेल्या वर्षी साधारण ८००-१,००० रुपयांना मिळणारी लहान घरगुती गणेशमूर्ती यंदा १,४०० ते १,५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच मागील वर्षी ७ ते ८ हजार रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारी ५ फुटी मूर्ती यंदा १४ ते १५ हजार रुपयांना मिळत आहे, तर १० फुटी मोठ्या मूर्तींचे दर २५-३० हजारांवरून थेट ४० ते ४५ हजार रुपयांच्या घरात गेले आहेत


From the young to the old: Traditional Ganesh idol-makers are super busy


केवळ गणेशमूर्तीच नव्हे, तर उत्सवासाठी लागणाऱ्या नित्य उपयोगी किराणा मालाच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. श्रावण महिना आणि आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तांदूळ, खाद्यतेल आणि साखरेच्या किमती कडाडल्या आहेत. गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात प्रतिकिलो तब्बल १५ रुपयांची वाढ होऊन तो ५५ ते ६० रुपयांवर पोहोचला आहे. सणांच्या काळात मागणी वाढल्याने हे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.


Matoli, mud idols and leafy decorations: Ganesh Chaturthi is all about  nature in rural Goa


सणासुदीचे अर्थशास्त्र : ‘लागतजन्य महागाई’ अन् ग्राहकांवरील ताण

अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास, सध्याची बाजारपेठ ही 'लागतजन्य महागाई' म्हणजेच (Cost-Push Inflation) या तत्त्वाने प्रभावित झाली आहे. जेव्हा उत्पादनाचे मूळ घटक जसे की कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी महागतात, तेव्हा पुरवठा साखळीतील अंतिम वस्तूंची किंमत आपोआप वाढते. सणासुदीच्या काळात भारतीय समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक भावनेमुळे वस्तूंची मागणी ही 'अलवचिक' (Inelastic Demand) राहते. म्हणजेच, दर वाढले तरीही नागरिक सण साजरा करण्यासाठी खरेदी करतातच. मात्र, यामुळे कुटुंबांच्या ऐच्छिक खर्चावर (Discretionary Spending) गदा येते. एकाच वेळी अन्नधान्य आणि पूजेचे साहित्य महागल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचा विक्रीचा टर्नओव्हर वाढलेला दिसत असला, तरी नफा घटला आहे. दुसरीकडे, ग्राहकांची क्रयशक्ती (Purchasing Power) कमी झाल्याने इतर बिगर-आवश्यक वस्तूंच्या खरेदीला कात्री लागली आहे.


Festival Shopping: Festive cheer takes over retail markets, ETRetail



गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी : गोव्यातील मूर्ती अर्थकारण

गोव्यातील गणेशोत्सव बाजारपेठेचे स्वरूप समजून घेण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची (GSPCB) आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरते. या आकडेवारीनुसार, गोव्यात केवळ नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्या पाहून एकूण बाजारपेठेचा अंदाज लावणे कठीण आहे. राज्यात एकूण ४६६ नोंदणीकृत व्यावसायिकांमार्फत तब्बल ८१,२५४ गणेशमूर्ती उपलब्ध केल्या जात आहेत. यामध्ये लहान पारंपरिक उत्पादकांपासून ते मोठ्या प्रमाणावर परराज्यातून मूर्ती आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.


We Visited Goa's Ganesh Idol Making Workshop | Best Handmade Eco friendly  Ganesh idol in making 2022


तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास, डिचोली तालुका राज्यात अव्वल स्थानी आहे. डिचोलीत ९४ नोंदणीकृत व्यावसायिक असून ते १६,६०४ मूर्तींची निर्मिती किंवा विक्री करत आहेत. डिचोलीतील पारंपरिक कुंभारकलेचे सामर्थ्य यातून स्पष्ट होते. येथील मये आणि कुंभारवाडा भागात ४४ नोंदणीकृत व्यावसायिक असून ते सुमारे ९,१८५ मूर्ती स्थानिक चिकट माती आणि स्वतःच्या चित्रशाळांद्वारे तयार करतात. बार्देश तालुक्यात ७४ नोंदणींमधून १३,३६६ मूर्ती, फोंडा तालुक्यात ७० नोंदणींमधून ९,६८८ मूर्ती आणि पेणणे तालुक्यात ६७ नोंदणींमधून ८,२५० मूर्ती उपलब्ध आहेत. हे चार तालुके मिळून राज्यातील एकूण नोंदणीच्या जवळपास दोन-तृतीयांश म्हणजेच ३०५ नोंदणी आणि ४८ हजारहून अधिक मूर्तींचा वाटा उचलतात.


Goa's artisans gear up for Chaturthi by sculpting traditional clay idols  |Gomantak Times


याउलट, केपे तालुक्याचे अर्थकारण अत्यंत वेगळे आणि धक्कादायक चित्र स्पष्ट करते. केपे तालुक्यात केवळ २२ नोंदणीकृत व्यावसायिक आहेत, मात्र त्यांच्यामार्फत १३,१५५ मूर्ती हाताळल्या जात आहेत. या मोठ्या आकड्यामागील मुख्य कारण म्हणजे तेथील एकाच नोंदणीअंतर्गत कोल्हापूरवरून तब्बल ८,५०० मूर्तींची आयात केली गेली आहे. संपूर्ण राज्यभरात किमान ४३ नोंदणींमध्ये कोल्हापूरवरून सुमारे ५,५६५ मूर्ती मागवल्याचा उल्लेख आहे. यावरून गोव्यात स्थानिक कलावंतांसोबतच परराज्यातून होणाऱ्या आयातीचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते.


Goa's artisans gear up for Chaturthi by sculpting traditional clay idols  |Gomantak Times


साहित्याचा विचार करता, ८९ नोंदणींमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस (PoP) चा वापर असल्याचे नमूद असून त्याद्वारे २४,९८६ मूर्ती तयार केल्या गेल्या आहेत. तर उर्वरित मूर्ती शाडू माती, चिकट माती आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, गोव्याची गणेशमूर्ती बाजारपेठ ही सूक्ष्म स्थानिक कारागीर आणि अवाढव्य असणारे व्यापारी अशा दुहेरी मॉडेलवर चालत आहे.


हेही वाचा
सर्व पहा