गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : होस्पेट-तिनईघाट-वास्को रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, रिलायन्स जिओ कनेक्टिव्हिटी विस्तार प्रकल्प, तसेच ईएसआय रुग्णालय या तीन प्रकल्पांवर २७ ऑगस्ट रोजी केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, अन्य अधिकारी, तसेच केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२७ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत हे तीन प्रकल्प प्रलंबित राहण्याची कारणे, तसेच आवश्यक परवानग्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्यातील मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विविध खात्यांच्या कामांचा आढावा घेतला. प्रलंबित प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर होणारी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
होस्पेट-तिनईघाट-वास्को रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प ५,०६० कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी दक्षिण गोव्यातील १२०.८७५ हेक्टर जमिनीसाठी वन्यजीव मंडळाच्या परवानगीची आवश्यकता आहे. परवानगी मिळालेली नसल्याने हा प्रकल्प प्रलंबित आहे. याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. रिलायन्स जिओच्या ५जी/४जी कनेक्टिव्हिटी विस्तार प्रकल्पासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. मोपा विमानतळावर सुरळीत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स जिओचा हा विस्तारित प्रकल्प आहे. त्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
ईएसआय प्रकल्पाचाही घेणार आढावा
मुळगाव येथे १५० खाटांच्या ईएसआय रुग्णालयासाठी राज्य सरकारने जमीन दिली आहे. मात्र, रुग्णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. बैठकीत ईएसआय रुग्णालयाच्या प्रकल्पाचाही आढावा घेतला जाणार आहे.


