वेर्णा बायपासवर दोन वाहनांचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

वेर्णा बायपासवर भरधाव कारने एआय कॅमेरा पोलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार प्रवासी जखमी झाले असून एका महिला प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. गाडी नुकत्याच बसवलेल्या एआय सिग्नल पोलला बसल्याने कॅमेरा यंत्रणा उद्ध्वस्त.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
वेर्णा बायपासवर दोन वाहनांचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

पणजी : वेर्णा बायपास महामार्गावर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रस्ता दुर्घटना घडली. वास्कोच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. या तीव्र अपघातात कारने महामार्गाच्या कडेला नुकत्याच बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक 'एआय' (AI) कॅमेरा आणि वाहतूक सिग्नलच्या खांबाला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ही कार महामार्गावरच उलटी झाली.

अपघातात दोन चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वास्कोकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने रस्त्यावरील खांबाला अत्यंत वेगाने धडक दिली. तर दुसऱ्या एका कारचाही पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने दुसऱ्या गाडीतील प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

उलटलेल्या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते. अपघातात हे चारही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिला प्रवाशाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज  रुग्णालयात पाठवले.

 माहितीनुसार, अपघातावेळी कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट एआय कॅमेरा पोलला धडक दिली. या धडकेमुळे प्रशासनाने बसवलेला नवीन एआय कॅमेरा आणि सिग्नल यंत्रणेचा खांब मुळापासून उखडून रस्त्यावर कोसळला आणि सरकारी मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि इतर प्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रस्त्यावरील कॅमेऱ्याचे अवशेष व कोसळलेला खांब बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा