पणजी :‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला युवा पिढीतील राजकारण्यांची गरज आहे. मात्र, युवकांनी केवळ पदे मिळवण्यासाठी राजकारणात न येता जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी राजकारणात यावे. राजकारणात येण्यापूर्वी राजकीय समज, जबाबदारीचे भान आणि समाजसेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चाळिशीनंतर राजकारणात येण्याचा सल्ला
आपल्याआधी एका वक्त्याने युवकांनी राजकारणात वयाच्या चाळिशीनंतर येण्याचा सल्ला दिला असून, हे मत आपल्याला पटले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. युवकांनी आधी आपल्या आयुष्यात स्थिर होणे आवश्यक आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करून त्यानंतर राजकारणात येण्याचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले.
या काळात युवकांमध्ये राजकारणासाठी आवश्यक असणारी समज आणि अनुभव निर्माण झालेला असेल. राजकारणात येण्यापूर्वी समाजसेवा सुरू ठेवणे आवश्यक असून, राजकारणात आल्यानंतर विकासाप्रती कटिबद्धताही असणे गरजेचे आहे. युवकांनी पारदर्शक, समस्या सोडवणारे आणि सर्वसमावेशक राजकारण करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मागील बारा वर्षांच्या काळात देशात अनेक विकासकामे झाली आहेत. काँग्रेस सरकारच्या तुलनेत भाजप सरकारच्या काळात देशाचा जीडीपी तीन पटीने वाढला असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. रस्ते, महामार्ग, पूल तसेच दळणवळणाच्या अन्य सुविधांचा विकास झाल्याचेही त्यांनी सांगितले.
‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. युवकांनी या विकासप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.


