पणजी :रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षामध्ये (आरजीपी) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर आणि पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब यांच्यात सोशल मीडियावर अप्रत्यक्ष शाब्दिक चकमक सुरू झाली असून, दोघांनीही एकमेकांचे नाव न घेता सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला आहे.
आरजीपीमधील अंतर्गत वाद काही काळ शांत होता. मात्र, शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरून त्याची सुरुवात झाली. मनोज परब यांनी कोणालाही उद्देशून किंवा कोणाचेही नाव न घेता एक पोस्ट केली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार वीरेश बोरकर यांनी अप्रत्यक्षपणे परब यांच्यावर निशाणा साधला.
‘कथानकाला’ प्राधान्य दिल्यास घाणेरडे राजकारण
“जेव्हा मतांसाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि ध्येयापेक्षा ‘कथानकाला’ अधिक प्राधान्य दिले जाते, तेव्हा घाणेरडे राजकारण सुरू होते. त्यामुळे एखाद्या राजकारण्याचे करिअर मजबूत आणि मोठे होईलही; पण शेवटी समाजाला त्याचा फारसा फायदा होत नाही,” असे मनोज परब यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.
“विचार कथानकाला आकार देतात. कथानक मतांना आकार देतात. मते गोव्याच्या भविष्याला आकार देतात. विचार करून निवड करा, गोवा ऐकतोय,” असे आमदार वीरेश बोरकर यांनी आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.


