नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर मोहीम उघडली आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, उत्पादनांबद्दलचे चुकीचे दावे आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५० हून अधिक प्रमुख अन्न उत्पादक कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. या कारवाईत नेस्टले इंडिया, पेप्सिको, कोका-कोला, अबॉट इंडिया आणि मॉन्डेलेझ यांसारख्या नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानकांच्या गंभीर उल्लंघनाविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली होती. विशेषतः एनर्जी ड्रिंक्स आणि मद्य उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनेक कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये आणि त्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
प्राधिकरणाने केवळ अन्न उत्पादक कंपन्यांवरच नव्हे, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि नामांकित रेस्टॉरंट साखळींवरही बडगा उगारला आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना १२ नोटीसा पाठवण्यात आल्या असून, गंभीर नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ॲमेझॉनच्या एका गोदामाचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. याशिवाय, केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा हट, डोमिनोज आणि कोष्ट कॉफीसारख्या ३० हून अधिक खाद्य सेवा प्रतिष्ठानांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. या कारवाईअंतर्गत डोमिनोजच्या पाच उपाहारगृहांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.
प्राधिकरणाच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता अनेक कंपन्यांनी स्वतःहून नियमावलीनुसार सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा, घटकांची योग्य व प्रामाणिक माहिती देण्यासंदर्भात एफएसएसएआयकडून भविष्यातही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.


