काँग्रेस अध्यक्षांच्या दौऱ्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे गोव्यात दौरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह केंद्रीय मंत्री गोव्याला भेटी देणार आहेत. गणेशचतुर्थीनंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा दौरा निश्चित झाला असून, त्यापूर्वी प्रमुख केंद्रीय नेते गोव्यात येतील.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 hours ago
काँग्रेस अध्यक्षांच्या दौऱ्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे गोव्यात दौरे

पणजी : आगामी विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी गोव्यातील राजकीय घडामोडींना मोठी गती आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत बैठका, आढावे आणि वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकताच गोवा दौरा करून पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडूनही केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मालिकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे गणेशचतुर्थीच्या सणानंतर गोव्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

भाजपचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील चर्चेदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी गणेशचतुर्थीनंतर गोव्याला भेट देण्याचे संकेत दिले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच पक्षाचे मंत्री, आमदार आणि विविध पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाच्या सुकाणू समितीने राज्यातील मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले होते. या मूल्यमापनावर आधारित सविस्तर अहवाल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना सादर केला. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार संकल्प आमोणकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. या चर्चेत राज्यातील विकासकामे आणि आगामी निवडणुकीची रणनीती यावर सविस्तर मंथन झाले.

राष्ट्रीय अध्यक्षांच्या या आगामी दौऱ्यापूर्वी भाजपचे अनेक बडे केंद्रीय नेते गोव्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे २५ ऑगस्ट रोजी नूतनीकरण केलेल्या पत्रादेवी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गोव्यात दाखल होत आहेत. त्यानंतर ६ आणि ७ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्मित प्रदेश कार्यालयाचे भव्य उद्घाटन होणार आहे. तसेच, ९ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पर्वरी येथील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी गोव्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांचे हे एकापाठोपाठ होणारे दौरे आणि त्यानंतर होणारा राष्ट्रीय अध्यक्षांचा संघटनात्मक दौरा यामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा