विविध ग्रामसभांमध्ये नागरी समस्यांवरून ग्रामस्थ आक्रमक

रस्ते, सांडपाणी, वाहतूक कोंडी, अतिक्रमणाचा विचारला जाब : मेणकुरे-धुमासेत गोंधळ तर मेरशीत उड्डाणपुलाची मागणी

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 hours ago
विविध ग्रामसभांमध्ये नागरी समस्यांवरून ग्रामस्थ आक्रमक

मेरशी : मोरजी, कोरगाव, मेणकुरे-धुमासे आणि मेरशी ग्रामसभांमध्ये रस्ते, अतिक्रमण, सांडपाणी, वाहतूक कोंडी आणि स्मशानभूमी उद्घाटनाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. गावागावांतील नागरी समस्यांवर प्रशासनाने तातडीने आणि ठोस उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.


Morjim - Wikipedia


पेडणे तालुक्यातील मोरजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास मोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्यावरून ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभेच्या सुरुवातीला सचिवांनी मागील इतिवृत्त वाचून दाखवले, ज्याला सभेने मंजुरी दिली. या सभेला उपसरपंच सुप्रिया पोके, पंच सदस्य सुरेखा शेटगावकर, भजनी शिरोडकर, मंदार पोके, फटू शिरगावकर, पवन मोर्जे आणि स्वप्नील शेटगावकर आदी उपस्थित होते.



स्थानिक रहिवासी तुकाराम शेटगावकर यांनी आठ लेखी प्रश्न मांडून गावातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापन व गटार स्वच्छता कोलमडल्याचा आरोप करत त्यांनी गटार स्वच्छता आणि झाडे-झुडपे हटवण्याच्या खर्चाचा हिशेब मागितला. रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाईचा सवाल करत, वाढत्या बेकायदेशीर बोअरवेलमुळे पारंपरिक विहिरींची पाणीपातळी खालावल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोअरवेलचे सर्वेक्षण करून अनधिकृत बोअरवेल सील करण्याची मागणी करण्यात आली.

गावातील लहान साकव (पूल), झाडांच्या फांद्या कापण्याचा खर्च आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सविस्तर हिशेब ग्रामस्थांनी मागितला. तसेच अनधिकृतपणे झाड कापल्याप्रकरणी शेटगावकर यांनी नुकसानभरपाई मागितली. गावात वाढती स्थलांतरित कामगारांची संख्या आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण आणण्याची मागणी झाली, ज्यावर सरपंचांनी प्रशासनाची बाजू मांडली.




गावात काम करणाऱ्या विविध मजुरांकडून मनमानी दर आकारले जात असल्याने नागरिकांची लूट होत असल्याचा मुद्दा धनंजय शेटगावकर यांनी उपस्थित केला. पंचायतीने कामगारांशी चर्चा करून कामाच्या स्वरूपानुसार योग्य दर निश्चित करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर कामगारांची बैठक बोलावून दरांबाबत सुसूत्रता आणण्याचे आश्वासन सरपंच विलास मोर्जे यांनी दिले.

पर्यटन क्षेत्रात रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनू शेटगावकर यांनी पाळीव कुत्र्यांची नोंदणी करून शुल्क आकारण्याची सूचना केली, ज्यावर योग्य निर्णय घेण्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. याशिवाय वाहन पार्किंगची व्यवस्था, अनधिकृत फलकांमुळे होणारी कोंडी आणि समुद्राकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा अडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.



कोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच कल्पिता कलशावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. काही भागांत घरांचे आणि शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. गणेश चतुर्थीपूर्वी सर्व वाड्यांवरील रस्त्यांचे खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. चतुर्थीपूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन सरपंच कल्पिता कलशावकर यांनी दिले. तसेच गावात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांची बेकायदेशीरता तपासून कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला.



डिचोली तालुक्यातील मेणकुरे-धुमासे ग्रामसभेत स्मशानभूमीच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून तीव्र वाद निर्माण झाला. उद्घाटन आधीच संपन्न झाल्याचे पंचायत मंडळाचे म्हणणे होते, तर उद्घाटन सोहळा पुन्हा रीतसर व सर्वसमावेशक पद्धतीने व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली. यावरून जोरदार शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. रागाच्या भरात एका ग्रामस्थाने खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी त्याला रोखले. या गोंधळामुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.



मेरशी ग्रामपंचायतीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गाजला. मेरशी जंक्शनवरील ‘एआय संचलित’ सिग्नल अपयशी ठरला असून केवळ २० सेकंदांचा वेळ मिळत असल्याने रायबंदर ते चिंबलपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, असा आरोप करण्यात आला. कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने शास्त्रीय अभ्यासाविना बेट तयार केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यावर मेरशी जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्यात यावा आणि तोपर्यंत सिग्नल बंद ठेवावा किंवा त्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणीकाँग्रेसचे नेते अमित पालेकर यांनी केली. 



न्यायालय सुरू झाल्याने या मार्गावर वकिलांसह नागरिकांची मोठी रहदारी असते. अवघ्या १५-२० सेकंदांच्या सिग्नलमुळे केवळ २-३ गाड्याच पुढे जाऊ शकतात. त्यामुळे म्हापसा किंवा अटल सेतूच्या धर्तीवर मेरशी जंक्शन ते पाटो/पणजी बायपासपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा अधिकृत ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला असून तो सरकारकडे पाठवला जाणार आहे, असे सरपंच सुशांत गोवेकर यांनी सांगितले.
हेही वाचा
सर्व पहा