चिंचणी येथील आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव : चिंचणी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेगा कर्करोग निदान शिबिरात एकूण १६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात ९ महिलांमध्ये स्तनाचा ट्यूमर, तर दोन रुग्णांमध्ये काखेतील लिम्फ नोड्स सुजल्याचे निदान झाले. दंत तपासणीदरम्यान कर्करोगपूर्व लक्षणे असलेले दोन रुग्णही आढळून आले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा दंत महाविद्यालय, संसर्गजन्य नसलेले रोग विभाग, आरोग्य सेवा संचालनालय आणि चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १३० महिला व ३४ पुरुष, अशा एकूण १६४ जणांनी तपासणी करून घेतली. शिबिरातील स्त्रीरोग तपासणीदरम्यान ८६ महिलांची तपासणी करण्यात आली, तर ६१ महिलांचे पॅप स्मीअर घेण्यात आले. शस्त्रक्रिया ओपीडीत सर्वाधिक १०५ रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेतला. दंत ओपीडीत ६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गोमेकॉ कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या साहाय्यक नोडल अधिकारी डॉ. श्रेया लोटलीकर, डॉ. सोमनाथ परब, गोवा दंत महाविद्यालयाच्या प्राध्यापक व प्रमुख डॉ. मनीषा खोमणे, एनसीडी सेलच्या डॉ. अश्मिता, तसेच चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. रश्मी देसाई उपस्थित होत्या.
शिबिरातच २४ दंत उपचार प्रक्रिया पूर्ण
दंत तपासणीमध्ये कर्करोगपूर्व लक्षणे असलेले दोन रुग्ण आढळले. त्यापैकी एका रुग्णामध्ये ल्युकोप्लाकिया, तर दुसर्यामध्ये टोबॅको पाऊच केराटोसिस आढळले. दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी गोवा दंत महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. याशिवाय तोंडाशी संबंधित अन्य दहा आजारांचे निदान करण्यात आले. शिबिरात पुरुषांच्या आरोग्य तपासणीअंतर्गत २१ पीएसए चाचण्या, नऊ सीबीसी चाचण्या आणि दोन थायरॉईड चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय जागेवरच २४ दंत उपचार प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.


