
गोवन वार्ता। पणजी : राज्यात रस्ते अपघातांचे तसेच मृत्यूचे सत्र सुरूच आहे. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकारही सुरूच आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यात वाहतूक पोलीस विभाग कार्यरत आहे. मात्र कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक अधिकाऱ्याची विभागाकडे मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. राज्यातील वाहतूक पोलीस विभागात कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे होमगार्डची तैनाती करून त्यांच्या भरोसे वाहतूक व्यवस्थापन कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
राज्यात वाहतूक पोलिसांचे १७ विभाग कार्यरत आहेत. त्यात उत्तर गोव्यात पणजी, म्हापसा, कळंगुट, पर्वरी, पेडणे, मोपा विमानतळ, हणजूण, डिचोली, तर दक्षिण गोव्यात फोंडा, मडगाव, फातोर्डा, कोलवा, कुडचडे, वास्को, दाबोळी विमानतळ, केपे आणि काणकोण मिळून १७ कार्यरत आहेत. त्यासाठी १६ निरीक्षक मंजूर करण्यात आले आहेत. फातोर्डा वाहतूक पोलीस विभागात अद्याप कर्मचारी मंजूर झालेले नाहीत. पेडणे वाहतूक पोलीस विभागात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. वाहतूक पोलीस विभागात ८७ उपनिरीक्षकांसह कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मिळून १,०१३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. असे असले तरी सध्या वाहतूक पोलीस विभागात ९३० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २४० गृहरक्षकांचा समावेश आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक निरीक्षक किंवा उपनिरीक्षकावर आहे. संबंधित वाहन चालकाला दंड ठोठावणे किंवा त्याच्यासंदर्भात न्यायालयाला अहवाल पाठविण्याची, तसेच इतर कारवाई करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यावर आहे. वाहतूक व्यवस्थापन तसेच वाहतूक कोंडी किंवा रस्ता व्यवस्थापनाची जबाबदारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर असते. असे असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे २४० गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागासाठी मंजूर झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ८३ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. गृहरक्षक वगळले तर ३२३ पदे रिक्त आहेत.
पणजीत १११ मंजूर; ७३ कर्मचारीच कार्यरत
पणजी वाहतूक विभागात ९ उपनिरीक्षकांपैकी एकच उपनिरीक्षक कार्यरत आहे. पणजी विभागात एकूण १११ कर्मचारी मंजूर असताना ७३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही २६ गृहरक्षक आहेत. त्यामुळे ८ उपनिरीक्षकांसह ३८ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गृहरक्षकांना वगळल्यास ४७ वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. वाहतूक विभागांपैकी डिचोलीत २८, मोपा विमानतळात १७, हणजूणमध्ये ८, फोंडामध्ये ८ आणि पेडणेमध्ये ६ कर्मचारी मंजुर झालेल्या पदांहून अधिक अाहेत.
पर्वरी, डिचोलीत उपनिरीक्षकच नाहीत
उपनिरीक्षक पदाची माहिती घेतल्यास पर्वरी आणि डिचोली वाहतूक विभागात एकही उपनिरीक्षक नाही. पणजीसह पेडणे, मोपा विमानतळ, कुडचडे, कोलवा आणि केपे वाहतूक विभागात एकच उपनिरीक्षक कार्यरत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.


