म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक आशा रेवानंद चोडणकर हिला म्हापसा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आशाने कारागृहातील एका महिला कैद्याला देण्यासाठी ड्रग्ज आत नेल्याचा संशय असून, संबंधित कैद्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
कारागृहात मादक पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे जीएचआरडीसीच्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सुमारे ८.१० वाजता आशाची फ्रिस्कींग पॉईंटवर तपासणी केली असता तिच्या थर्मासमध्ये २ ग्रॅम चरस आणि २३६ ग्रॅम गांजा आढळला. या ड्रग्जची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे.
तिच्या लॉकरची तपासणी केली असता तीन मोबाईल फोन आणि तीन एटीएम कार्ड सापडले. कारागृह अधीक्षक सुचिता देसाई यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आशाला अटक करण्यात आली.
पोलीस तपासात आशाने महिला विभागातील एका कैद्याला देण्यासाठी ड्रग्ज कारागृहात आणल्याचा संशय समोर आला आहे. त्यामुळे संबंधित कैद्याला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, कारागृहात प्रतिबंधित वस्तूंची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जीएचआरडीसी कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांनी बदली करण्याची सूचना प्रशासनाने महामंडळाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौकशीनंतर बडतर्फीची कारवाई : मुख्यमंत्री
कोलवाळ कारागृहात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला सुरक्षारक्षकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. संबंधित सुरक्षारक्षकाचे निलंबन करून चौकशीनंतर बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, कारागृहातील ड्रग्ज तस्करी सरकार खपवून घेणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


