पणजी : गोव्यात गेल्या पाच वर्षांत अडीचशेहून अधिक मुले बेपत्ता झाली असून, दुर्दैवाने त्यातील तब्बल ५८ टक्के बालकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. दुसरीकडे, याच काळात मानवी तस्करी (ह्युमन ट्रॅफिकिंग) प्रकरणी ८० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असली, तर गुन्हे सिद्ध होऊन दोषी ठरणाऱ्यांचे प्रमाण अवघे ४ टक्के आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी संसदेत एका लेखी उत्तरात ही चिंताजनक आकडेवारी जाहीर केली आहे.
वर्षनिहाय बेपत्ता बालकांची आकडेवारी
| वर्ष | बेपत्ता मुले | सापडलेली मुले | न सापडलेली मुले |
| २०२० | ५२ | २२ | ३० |
| २०२१ | ४३ | १४ | २९ |
| २०२२ | ५५ | २३ | ३२ |
| २०२३ | ४८ | १७ | ३१ |
| २०२४ | ५८ | ३० | २८ |
| एकूण | २५६ | १०६ | १५० |
संसदेच्या पटलावर ठेवलेल्या माहितीनुसार, गोव्यात २०२० ते २०२४ या कालावधीत एकूण २५६ मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यापैकी १०६ मुले सुखरूप सापडली असून, १५० हून अधिक मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. गोव्यात दरवर्षी सरासरी ४३ ते ५८ मुले बेपत्ता होतात.
मानवी तस्करीत कारवाई अधिक, पण शिक्षा नगण्य
गोव्यात मानवी तस्करीच्या विरोधात पोलिसी कारवाया होत असल्या तरी आरोपींना दोषी सिद्ध करण्याचे प्रमाण अत्यंत निराशाजनक आहे. २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली ८८ जणांना अटक करण्यात आली, परंतु न्यायालयाकडून त्यातील केवळ ४ जणांनाच दोषी ठरवण्यात यश आले आहे.
मानवी तस्करीविरोधात कारवाई
| वर्ष | अटक केलेले आरोपी | दोषी ठरलेले आरोपी |
| २०२० | २७ | ० |
| २०२१ | २६ | ० |
| २०२२ | ९ | २ |
| २०२३ | २१ | ० |
| २०२४ | १३ | २ |
| एकूण | ८८ | ४ |


