आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र द्या

‘अपार आयडी’ तयार करण्यासाठी शिक्षण संचालकांचे शाळांना निर्देश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 mins ago
आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र द्या

पणजी : आधारकार्ड नसल्यामुळे किंवा आधार नोंदणी, दुरुस्ती अथवा अद्ययावतीकरणाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने ‘अपार आयडी’ (APAAR)  तयार करण्यात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळांनी बोनाफाईड प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

‘अपार आयडी’ तयार करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याने आधार नसलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोनाफाईड प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

या बोनाफाईड प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना मामलेदार कार्यालयातून रहिवासी दाखला मिळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे आधार नोंदणी किंवा त्यातील आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना ‘अपार आयडी’ तयार करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

आधारकार्ड नसणे, आधार नोंदणीची आवश्यकता असणे अथवा आधारमधील माहिती दुरुस्त किंवा अद्ययावत करण्याची गरज असणे, अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. शाळांनी अशा विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.