पणजी : ‘वंदे मातरम्’ देशाचे गीत आहे, कोणा एका पक्षाचे नव्हे. स्वातंत्र्यसैनिकांसह महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाष चंद्र भोस या सर्वांनी जे वंदे मातरम गीत गायीले होते तेच ‘वंदे मातरम्’ अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते गात आहेत. ‘वंदे मातरम्’ भाजपसह सर्व पक्षांचे व देशाचे गीत आहे. ते राजकारणासाठी नाही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.
सध्या ‘वंदे मातरम्’ गीतावरून भाजप आणि कॉंग्रेस पक्षामध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गिरीश चोडणकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गिरीश चोडणकर यांनी सामाजीक माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पुढे म्हटले आहे, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोव्यात आयोजित ‘एकवोट बीएलए व बूथ वर्कर्स’ अधिवेशनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’चे अभिमानाने गायन करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिक व नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ गायले आहे. त्यामुळे हे गीत कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातही ‘वंदे मातरम्’ गायले गेले आहे. तसेच भाजपसह विविध पक्षांचे मुख्यमंत्री आणि नेत्यांनीही राष्ट्रीय गीताचा सन्मान केला असल्याचे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. ‘वंदे मातरम्’ हे भारताचे आणि प्रत्येक भारतीयाचे आहे. ते पक्षीय राजकारणापेक्षा श्रेष्ठ असून कोणत्याही पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे आहे.’ ‘वंदे मातरम्!’ असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.


