कर्नाटकातील पर्यटकाचा कळंगुटमध्ये खून झाल्याचे शवचिकित्सेनंतर उघड

पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल : कारमध्ये सापडला मृतदेह

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
16th August, 11:38 pm
कर्नाटकातील पर्यटकाचा कळंगुटमध्ये खून झाल्याचे शवचिकित्सेनंतर उघड

म्हापसा : कळंगुट येथील फुटबॉल मैदानाजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रेन्ट-अ-कॅब कारच्या मागील सीटवर मृतावस्थेत सापडलेल्या कर्नाटकातील पर्यटकाचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताची ओळख षण्मुखा शिवपुत्रा भाविमणी (४१, रा. लिंगासागूर, रायचूर, कर्नाटक) अशी झाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, षण्मुखाला मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली होती. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण खुनाच्या गुन्ह्यात रूपांतरित करण्यात आले.
११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दीड वाजता रेन्ट-अ-कॅब स्विफ्ट कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पाहणी केली असता कारच्या मागील सीटवर षण्मुखा मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठविण्यात आला.
शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर या प्रकरणाचा तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप संशयितांची ओळख पटलेली नाही.
मित्र-मैत्रिणीसोबत आला होता गोव्यात
षण्मुखा भाविमणी ८ ऑगस्ट रोजी मित्र-मैत्रिणीसोबत गोव्यात पर्यटनासाठी आला होता. गोव्यात तो भरपूर दारू पिऊ लागला. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु मी अजून दोन दिवस गोव्यात राहतो, असे म्हणून षण्मुखा त्यानंतर कळंगुटमध्ये थांबला, तर त्याचे मित्र-मैत्रीण १० ऑगस्ट रोजी गावी परतले. षण्मुखाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर दोघेही १६ ऑगस्ट रोजी गोव्यात येऊन कळंगुट पोलिसांसमोर जबाब नोंदवला.

हेही वाचा
सर्व पहा