मडगाव : नावेलीमधील रुमडामळ (Rumdamol-Navelim) परिसरातील एका व्यक्तीला अवघ्या ६४ दिवसांसाठी सुमारे २.९४ कोटींचे पाण्याचे बिल (Water Bill) देण्यात आले आहे. हा प्रकार समोर आणत सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश भगत (Siddhesh Bhaghat) यांनी नागरिकांनी बिले तपासून घ्यावीत, असे आवाहन केले आहे.
नावेलीतील या सर्वसामान्य कुटुंबाला सार्वजनिक बांधकाम खात्याने (PWD/ Public Works Department) २,९४,६३,१३१ रुपये पाण्याचे बिल पाठवले आहे. हे बिल १४ मे ते १६ जुलै २०२६ या ६४ दिवसांच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले. या बिलामध्ये आधीचे रीडिंग अवघे ६७२ युनिट्स दाखवले आहे, तर चालू रीडिंग थेट ६,८४,६७२ युनिट्स दाखवण्यात आले आहे. म्हणजेच या कुटुंबाने ६४ दिवसांत ६,८४,००० युनिट्स पाणी वापरल्याचे यात नमूद केले आहे. एका सिंगल मीटरवर संपूर्ण हाऊसिंग बोर्डाचे बिल देण्यात आल्यासारखा हा प्रकार असल्याचे भगत म्हणाले.
सिद्धेश भगत यांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ शेअर करतानाच नागरिकांनी पाण्याची बिले तपासून घ्यावीत. बिलावरील चालू युनिट्स, मागील युनिट्स आणि दिवसांची संख्या तपासूनच पैसे भरावे. सिस्टीममधील तांत्रिक दोषांमुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


