बसमध्ये प्रवाशाची पर्स चोरीला; एटीएमचा गैरवापर करून ७० हजारांची फसवणूक

बाळ्ळी ते मडगाव बस प्रवासादरम्यान सीमा वेळीप यांची पर्स चोरून अज्ञाताने त्यांच्या व मुलीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे ७० हजार रुपये लांबवल्याची फसवणुकीची घटना घडली असून मडगाव पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 mins ago
बसमध्ये प्रवाशाची पर्स चोरीला; एटीएमचा गैरवापर करून ७० हजारांची फसवणूक

मडगाव : बाळ्ळी येथून मडगाव येथे बसने प्रवास करणाऱ्या सीमा वेळीप (रा. बाळ्ळी) यांची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. त्या पर्समधील एटीएम कार्डचा गैरवापर करत चोरट्याने दोन वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण ७० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केली. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते १०:१५ वाजण्याच्या सुमारास बाळ्ळी ते मडगाव बस प्रवासादरम्यान घडली. तक्रारदार सीमा वेळीप या बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये रोख रक्कमेसह तक्रारदाराच्या मुलीचे एटीएम कार्ड आणि इतर महत्त्वाचे वैयक्तिक सामान होते.

पर्स लांबवल्यानंतर संशयिताने चोरलेल्या एटीएम कार्डचा त्वरित गैरवापर केला. त्याने तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून २० हजार रुपये आणि त्यांच्या मुलीच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये परस्पर काढून घेतले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलकुष वेळीप करत आहेत.



हेही वाचा
सर्व पहा