मडगाव : बाणावली येथील अकसोना परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा उपचारासाठी नेताना दुर्दैवी मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १५ ऑगस्ट रोजी पहाटे ३.०९ वाजण्याच्या सुमारास वेलांकिनी चॅपेलनजीक घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी अर्टिगा कारचा चालक हलप्पा लमानी (रा. कळंगूट, मूळ रा. कर्नाटक) हा बाणावली येथून वार्काच्या दिशेने जात होता. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने अत्यंत भरधाव वेगाने गाडी चालवून समोरून जाणाऱ्या हिरो होंडा दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि गाडी दुचाकीवर चढवली.
या अपघातात दुचाकीचालक शिवानंद मस्तोले (रा. बाणावली) आणि मागे बसलेले रॉक फर्नांडिस (रा. बाणावली) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शिवानंद मस्तोले यांना तातडीने बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेप्रकरणी कोलवा पोलिसांनी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने गाडी चालविल्याप्रकरणी कारचालक हलप्पा लमानी याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत करत आहेत.


