दिल्लीने नाही, गोमंतकीयांनी गोव्याची दिशा ठरवावी : आमदार विजय सरदेसाई

गोव्यात दिल्लीनियंत्रित नाही, तर गोमंतकीयांचे सरकार हवे; कारण पक्षांतरामुळे जनमताचा नेहमी विश्वासघात झाला असून जमीन व संस्कृतीच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांचे सरकार आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
दिल्लीने नाही, गोमंतकीयांनी गोव्याची दिशा ठरवावी : आमदार विजय सरदेसाई

मडगाव : राज्यातील जनतेला सध्या आपली जमीन, संस्कृती, ओळख आणि जीवनशैली टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गोव्यात दिल्लीतून नियंत्रित होणारे नाही, तर गोमंतकीयांनी स्वतः चालवलेले आणि स्थानिक जनतेला उत्तरदायी असणारे सरकार आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर भाष्य करताना सरदेसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला. तरीही, विकसित भारताच्या उभारणीत गोव्याने उच्च दरडोई उत्पन्न, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील भक्कम कामगिरीद्वारे वेळोवेळी मोठे योगदान दिले आहे. मात्र, दुर्दैवाने आजही गोमंतकीयांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी तसेच जल, जमीन आणि जंगल वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे.

सध्याचे सरकार स्थानिक महत्त्वाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहे, कारण या सरकारची सूत्रे दिल्लीवरून हलवली जात आहेत, असा थेट आरोप सरदेसाई यांनी केला. गोव्याला अशा सरकारची गरज आहे जे गोव्याच्या भूमीतून चालेल आणि केवळ गोमंतकीयांप्रती उत्तरदायी असेल.

आमदारांच्या पक्षांतरामुळे लोकशाही अधिकारांचा आणि जनतेच्या कौलाचा वारंवार विश्वासघात झाला असल्याचे सांगताना त्यांनी काही आकडेवारी मांडली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर २०२२ च्या निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी पक्षांतर केले. केवळ या दोन मोठ्या घडामोडींमध्ये १८ आमदारांनी पक्षांतर करून जनादेश हायजॅक केला. निवडणुकीनंतर लोकशाहीचा झालेला हा खेळ लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला असून, आता आगामी २०२७ च्या निवडणुकीतही अशाच प्रकारची पुनरावृत्ती होण्याची भीती गोमंतकीयांच्या मनात आहे.

विजय सरदेसाई यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, तुमचे मत हा एक पवित्र जनादेश आहे, तो लोकप्रतिनिधींना पक्षांतरासाठी दिलेला 'ब्लँक चेक' नव्हे. मतदारांनी फुटीर राजकारणाला नाकारले पाहिजे आणि जनमताचा आदर करणाऱ्या, गोव्याच्या हितसंबंधांसाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि 'गोंयकारपण' जपणाऱ्या सरकारलाच निवडून दिले पाहिजे. गोव्याचे सरकार हे गोव्यातून, गोमंतकीयांद्वारे आणि केवळ गोव्याच्या भल्यासाठीच चालवले गेले पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी शेवटी केला.


हेही वाचा
सर्व पहा