पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची (BAC) २१ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. सभापती गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित राहतील. विधिमंडळ खात्याच्या सचिव नम्रता उल्मन यांनी ही माहिती दिली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ३१ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशनाचे समन्स जारी केले आहे. ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर असे अवघे ३ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. विषय अधिक आणि दिवस कमी असल्याने कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, त्यामुळे अधिवेशन अधिक दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. अधिवेशन किमान १५ दिवसांचे असावे, असे पत्र काँग्रेसने राज्यपालांना पाठवले होते. त्यामुळे अधिवेशनाच्या कालावधीवरून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विरेश बोरकर, आमदार विजय सरदेसाई आणि आमदार व्हेंझी व्हिएगस हे कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत.


