हॉटेलमध्ये झोपलेल्या मित्राची ४ लाखांची सोन्याची साखळी चोरून काढला पळ

पणजी पोलिसांकडून एका अटक

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
हॉटेलमध्ये झोपलेल्या मित्राची ४ लाखांची सोन्याची साखळी चोरून काढला पळ

पणजी : हॉटेलच्या खोलीत मुक्कामास असलेला मित्र मद्यधुंद असल्याचे पाहून त्याच्या गळ्यातील ४ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून पळ काढणाऱ्या आरोपीस पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंगद यादव (रा. उज्जैन, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोवारपेट-चेन्नई (तामिळनाडू) येथील रहिवासी दिलीप प्रेमचंद्र कोठारी हे तिसवाडी-पणजी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. १४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ३.०० ते सकाळी ६.०० या वेळेत त्यांचा मित्र अंगद यादव हा त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खोलीत आला होता. या वेळी तक्रारदार दिलीप कोठारी हे दारूच्या नशेत असल्याचे पाहून आरोपीच्या मनात पाप आले. त्याने संधी साधून तक्रारदाराच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (अंदाजे किंमत रु. ४,००,०००/-) चोरून तेथून पळ काढला.

नशा उतरल्यानंतर गळ्यातील सोन्याची साखळी गायब असल्याचे दिलीप कोठारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पणजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री २०:४६ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदवला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवून संशयित आरोपी अंगद यादव याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक (PSI) रोहन मडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा