पणजी : दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील कुसमण येथे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'लगे रहो मुन्नाभाई', 'फॅशन' आणि 'देसी बॉईज' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत काम केलेला अभिनेता अश्विन मुशरन याच्यावर चुकीच्या बाजूने कार चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन मुशरन यांची कार चुकीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, जखमींपैकी एकाच्या हाडाचा तुकडा कारच्या टायरच्या फेंडरमध्ये अडकल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांशी हुज्जत अन् तीव्र वाद
अपघात घडल्यानंतर स्वतःची चूक मान्य करून जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत करण्याऐवजी अश्विन मुशरन आणि त्यांच्या पत्नीने उलट अपघातग्रस्त दुचाकीस्वार अन् तेथे जमलेल्या नागरिकांशीच वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अमोल काणेकर आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्याला घेराव घातला अन् त्याच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल जाब विचारला.
माफी मागितल्यानंतरच सोडले
स्थानिक नगरसेवक अमोल काणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अपघातानंतर अभिनेत्याच्या पत्नीने स्थानिकांवर थुंकण्याचा प्रकार केला, तसेच वाद मिटण्यापूर्वीच अभिनेता अपघातस्थळ सोडून एका पार्टीला निघून गेला, असा दावा काणेकर यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी अभिनेत्याची कार रोखून धरली. अखेर काही वेळाने अभिनेता परत आला आणि त्याने उपस्थितांची माफी मागितली. मात्र, ही माफी केवळ औपचारिकता म्हणून आणि निष्काळजीपणाने मागण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत तपास व निष्कर्षांची प्रतीक्षा आहे.


