काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गोव्यात

विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोमवारी गोव्यात येत आहेत. दुपारी ते काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, मंगळवार, १८ रोजी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठक घेणार आहेत. या बैठकीत युती व निवडणूक रणनीतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


16th August, 11:06 pm
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गोव्यात

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोमवारी गोव्यात येत आहेत. दुपारी ते काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, मंगळवार, १८ रोजी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठक घेणार आहेत. या बैठकीत युती व निवडणूक रणनीतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खर्गे प्रथमच गोव्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या गोवा दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी गोव्यात पोहोचल्यानंतर ते थेट वेर्णा येथे जाणार आहेत. वेर्णा येथील क्विंटा दे वालादारेस येथे बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. मेळाव्यात खर्गे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मेळाव्यानंतर ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष आणि आमदार या समितीचे सदस्य आहेत. ही बैठक गोपनीय स्वरूपाची असेल. त्यानंतर खर्गे एनजीओंच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी दिली.
भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची युती होणे गरजेचे आहे. युतीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. या समितीची एक बैठक झाली आहे. आम आदमी पक्ष (आप) व रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) या पक्षांनी युतीसाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीबाबतची चर्चा थांबवली आहे. त्यामुळे खर्गे युतीबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे. खर्गे पक्षाच्या कार्यक्रमासाठी गोव्यात येत आहेत. त्यामुळे ते युतीबाबत इतर पक्षांशी चर्चा करण्याची शक्यता नाही.
युतीच्या चर्चेबाबत काँग्रेसकडून ‘आप’ला पत्र आलेले नाही. निमंत्रण मिळाल्यास चर्चेसाठी तयार असल्याचे ‘आप’चे गोवा राज्य संघटक वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. आरजीला काँग्रेसकडून युतीच्या चर्चेसाठी पत्र आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी चर्चेला प्रतिसाद देण्याची तयारी दर्शवली आहे. खर्गे यांच्या नियोजित कार्यक्रमात इतर पक्षांसोबतच्या बैठकीचा समावेश नाही. युतीच्या चर्चेसाठी काँग्रेसने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे, असे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी स्पष्ट केले.

‘वंदे मातरम्’ला विरोध हा भाजपचा अपप्रचार !
काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीत म्हटले जाते. यापूर्वी राष्ट्रीय अधिवेशनातही ‘वंदे मातरम्’चे गायन झाले आहे. मात्र, काँग्रेसचा ‘वंदे मातरम्’ला विरोध असल्याचा भाजपकडून अपप्रचार केला जात आहे. राज्यघटना लागू झाल्यानंतर आरएसएसच्या मुखपत्राने प्रस्तावनेवर टीका केली होती, असे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा