अपहरण, लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता

पीडितेसह वडिलांनी जबाब फिरविल्याचे न्यायालयाचे निरी​क्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
56 mins ago
अपहरण, लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता

पणजी : अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने युवकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. पीडित मुलीने न्यायालयात संशयिताने तिच्यासोबत काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगितले, तर तिच्या वडिलांनीही न्यायालयात जबाब फिरविल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्या. डॉ. पूजा कवळेकर यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी फोंडा पोलिसांत आपल्या १६ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मुलीची कर्नाटकातून सुटका केली आणि तिच्यासोबत असलेल्या युवकाला ताब्यात घेतले.
त्यानंतर मुलीचा बिगर सरकारी संस्थेमार्फत जबाब नोंदविण्यात आला. त्यावेळी संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. मुलीची वैद्यकीय तपासणी तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले.
प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन पाॅक्सो न्यायालयाने संशयिताविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. संशयिताने न्यायालयात दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर संशयिताने पुन्हा जामीन अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.
न्यायालयातील जबाबामुळे संशयिताला दिलासा
खटल्यादरम्यान पीडित मुलीने संशयितासोबत मैत्रीचे संबंध असल्याचे आणि ती स्वतःहून त्याच्यासोबत गेल्याचे सांगितले. तसेच संशयिताविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. तिच्या वडिलांनीही न्यायालयात जबाब फिरविल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध पुराव्यांतून आरोप सिद्ध होत नसल्याने न्यायालयाने युवकाची निर्दोष मुक्तता केली.      

हेही वाचा
सर्व पहा