पणजी : तब्बल दोन महिने समुद्रातील ताज्या माशांसाठी गोमंतकीयांना प्रतीक्षा करावी लागली. आता समुद्र शांत झाला असून पावसाचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे गोमंतकीयांना ताज्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी माशांची पुन्हा उपलब्धता झाली आहे. बाजारात ताजे मासे मोठ्या प्रमाणात येत असले तरी त्यांचे दर अद्याप चढेच आहेत.
पावसाने गेल्या काही दिवसांत विश्रांती घेतल्याने वातावरणही निवळले आहे. मंगळवारी करंझाळे येथील प्रसिद्ध रापणीला सुरुवात झाली. करंझाळेच्या रापणीत मोठ्या प्रमाणात करबट मासे मिळाले. त्याशिवाय सुंगटा, बांगडे, सरंगे (काळी पापलेट) आदी विविध प्रकारचे मासेही मोठ्या प्रमाणात मिळाले. रापण पडल्याची बातमी कळताच मोठ्या संख्येने लोक ताज्या माशांच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले. याविषयी बोलताना स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर प्रथमच करंझाळे येथे रापण टाकण्यात आली.
इतर समुद्रकिनारीही मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, पावसामुळे समुद्राचे वातावरण खवळलेले असल्याने मच्छीमारांनी रापण टाकण्यास विलंब केला. यापूर्वी रापण टाकली असती तर जाळ्यात केवळ चिखल आणि कचरा अडकण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व मच्छीमारांनी एकमताने पाऊस कमी झाल्यानंतरच रापण टाकण्याचा निर्णय घेतला, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
दरम्यान, मागातून मासेमारी करण्यासाठीही मोठी लगबग सुरू झाली आहे. मासे सध्या वरच्या थरात येत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात न जाता किनाऱ्यापासून काही अंतरावरच जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे मिळत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या माशांना मोठी मागणी वाढली आहे.
माशांची उपलब्धता, मात्र मासे महागच!
मासे मोठ्या प्रमाणात बाजारात येत असले तरी सुरुवातीला त्यांचे दर बरेच महाग आहेत. नारळी पौर्णिमेनंतर माशांचे दर कमी होण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. सध्या मोठे बांगडे १०० रुपयांना ६, बारीक बांगडे १०० रुपयांना १०, सुंगटा ५०० रुपयांना २५ नग, धाकटी मोरी ५०० रुपयांना २ नग, तर बारीक इसवण ५०० रुपयांना २ नग या दराने विकले जात आहेत.


