पणजी: गोवामुक्तीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण म्हणून पत्रादेवी येथे बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या स्मारकाचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल. यासाठी १५ ते २० ऑगस्ट दरम्यानची तारीख ठरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
क्रीडा खात्यातर्फे आयोजित तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री रमेश तवडकर, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी गोवा मुक्तीसाठी आणखी १४ वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीत अनेक व्यक्तींनी गोवा मुक्तीसाठी लढा दिला.
काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. १५ ऑगस्ट १९५५ रोजी गोवा मुक्तीसाठी देशभरातील सत्याग्रही पत्रादेवी सीमेवर जमा झाले. त्यांनी गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता; पोर्तुगीजांनी त्यांच्यावर अमानुष पद्धतीने गोळीबार केला. यामध्ये काही सत्याग्रही शहिद झाले. त्यांची आठवण म्हणून हे स्मारक बांधण्यात आले आहे.
ते म्हणाले, राज्य सरकारतर्फे ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान आझाद मैदानावर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये ‘वंदे मातरम्’ची १५० वर्षे, देशाची फाळणी, त्यामुळे लोकांवर झालेले अत्याचार आदींची माहिती देण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी विशेष करून युवकांनी हे प्रदर्शन नक्की पाहावे. भविष्य घडवण्यासाठी आपला भूतकाळ माहिती असणे आवश्यक असते. विकसित भारत, स्वयंपूर्ण गोवा करण्यात युवा पिढीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी सर्वांनी यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे.
आजची युवा पिढी भाग्यवान
मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, आजची युवा पिढी भाग्यवान आहे. कारण त्यांना हाती तिरंगा घेता येतो, ‘वंदे मातरम्’ , भारत माता की जय म्हणता येते. मी लहान असताना आम्हाला असे काहीही करता येत नव्हते.


