राज्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे ८८२ संशयित रुग्ण

केवळ ७ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10 mins ago
राज्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे ८८२ संशयित रुग्ण

पणजी : राज्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे ८८२ संशयित रुग्ण आढळले होते. मात्र अंतिम चाचणीनंतर यातील केवळ ७ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. सर्व ७ रुग्ण दक्षिण गोव्यातील होते. यात फोंडा मधील ३, मडगाव, कुडतरी, सांगे आणि लोटली मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यंदा जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. सततच्या ऊन पावसामुळे डासांची पैदास अधिक झाली. यामुळे रुग्णसंख्या वाढल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर तसेच मे महिन्यात डेंग्यूचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. मे महिन्यात पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवले जाते. अशावेळी पाण्यात डासांची उत्पत्ती होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसासह ऊन देखील असते. यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये देखील वाढ होते. राज्यात जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. मात्र यंदा पावसासह ऊन देखील पडले होते. यामुळे रुग्ण संख्या वाढली आहे.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी खात्यातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार हॉटस्पॉटसह अन्य भागात दर आठवड्याला डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येत आहेत. याशिवाय स्वच्छता मोहीम, जागृती, तपासणी करणे आदी उपाय करण्यात येत आहेत. डासांचे प्रमाण अधिक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी देखील आपल्या घराची, परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रुग्ण संख्या
महिना            २०२५         २०२६
जानेवारी         ७               ५
फेब्रुवारी         ९                १
मार्च              ७                ४
एप्रिल           ६                 १
मे                 ४                 ५
जून             १०                 १
जुलै            १३                 ७            

हेही वाचा
सर्व पहा