आरक्षण निश्चित होईपर्यंत ‘उटा’चा लढा सुरूच राहणार

एसटी विधानसभा आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी झाली असली तरी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ‘उटा’च्या नेत्यांनी केला आहे. सरकारवर दबाव आणण्यासोबतच जनजागृती करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी एसटी समाजाचा पणजीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आंदोलनाऐवजी मेळावा घेण्याचा निर्णय ‘उटा’ने घेतला आहे, अशी माहिती ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.


10th August, 11:44 pm
आरक्षण निश्चित होईपर्यंत ‘उटा’चा लढा सुरूच राहणार

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गोविंद गावडे.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : एसटी विधानसभा आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी झाली असली तरी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ‘उटा’च्या नेत्यांनी केला आहे. सरकारवर दबाव आणण्यासोबतच जनजागृती करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी एसटी समाजाचा पणजीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आंदोलनाऐवजी मेळावा घेण्याचा निर्णय ‘उटा’ने घेतला आहे, अशी माहिती ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘उटा’ नेत्यांनी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गोवा विधानसभा एसटी आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बैठका, मेळाव्यांसोबतच आरक्षण लागू करण्यास काही समाजांकडून हरकतीही घेण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे काही जण निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. प्रस्थापितांमध्ये निराशा आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी समाजाच्या आरक्षणाचा लाभ आपल्या समाजाला मिळावा, यासाठी धनगर समाजाने एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे. मागणीच्या पाठपुराव्यासाठी धनगर समाजाच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
जनगणना आयुक्तांची नियुक्ती करून आरक्षणाची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी एसटी समाजाचे समाधान झालेले नाही. मतदारसंघ आरक्षणाची अधिसूचना जारी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
दुसरीकडे, जनगणना होईपर्यंत आरक्षण लागू करू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच इतर काही समाजही ही मागणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, आगामी काळात राज्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी सायंकाळी ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे आणि सभापती गणेश गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. सभापती गणेश गावकर यांनी आरक्षणाबाबत बोलण्यास नकार दिला. विधानसभा अधिवेशनासंदर्भात आपली भेट होती, असे त्यांनी सांगितले. आरक्षणाची कार्यवाही लवकर व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.


आरक्षणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणी : वेळीप
आरक्षणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. आता १३ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मेळावा घेण्याचे ठरवले आहे. एसटीसाठी चार मतदारसंघ आरक्षित होतील. प्रक्रियेनुसार मतदारसंघ निश्चित केले जातील, अशी माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली.

आरक्षण प्रक्रिया त्रुटीमुक्त असावी : मायकल लोबो
एसटीसाठी राजकीय आरक्षण नक्कीच लागू करावे; परंतु ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे त्रुटीमुक्त असेल, सोबतच हे आरक्षण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशीरदृष्ट्या टिकून राहू शकेल याचीही खात्री सरकारने करावी : मायकल लोबो, आमदार, कळंगूट

हेही वाचा
सर्व पहा