पणजी: गोव्यात अनुसूचित जमातीच्या (ST) राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधिकच तीव्र झाला असून, यावर विविध मतदारसंघांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे समर्थक पणजी येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात एकत्र आले असून. एकंदरीत मुद्यांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी ते विस्तृत चर्चा करतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. दामू नाईकांनी काल दिलेल्या माहितीप्रमाणे ही बैठक बोलावण्यात आली आहे. यास मंत्री सुभाष फळदेसाई देखील उपस्थित आहेत.

या बैठकीत सुरुवात होण्याआधी फळदेसाई समर्थकांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण लागू करताना ते केवळ एकाच ठरावीक मतदारसंघापुरते किंवा कायमस्वरूपी न ठेवता, ते रोटेशन पद्धतीने देण्यात यावे, अशी ठाम मागणी मांडली. जनगणनेच्या आकडेवारीनुसार ज्या-ज्या मतदारसंघांत अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे, त्या सर्व मतदारसंघांना आलटून-पालटून म्हणजेच रोटेशननुसार आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. यामुळे इतर मतदारसंघांतील एसटी समाजाच्या घटकांनाही विधानसभेत प्रतिनिधित्वाची समान संधी मिळेल, असे ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आरक्षण प्रक्रियेत या रोटेशन पद्धतीचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाच्या वरिष्ठांकडे केली जाईल असे एकजण म्हणाला.

दरम्यान, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याविषयावर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री, अध्यक्ष आणि पक्षाचे विविध प्रतिनिधी एकत्र येऊन राजकीय विषयांवर सातत्याने चर्चा करत असतात. त्यामुळे जाहीरपणे किंवा माध्यमांतून भाष्य करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांचा असंतोष आणि त्यांच्या मुद्यांवर योग्य त्या वेळी योग्य निर्णय होईल, हा भापचा अंतर्गत मामला आहे, असे त्यांनी नमूद केले.

पक्षाची स्वतःची एक निर्णय प्रक्रिया असून, त्या चौकटीत राहून सर्वांना न्याय देणारी योग्य भूमिका पक्ष घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री सुभाष फळदेसाई आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासह एसटी समाजाशी संबंधित नेते आणि विविध मतदारसंघांतील मागण्यांवर पक्षात गांभीर्याने विचार सुरू असून, त्या प्रक्रियेनुसारच योग्य ती कारवाई केली जाईल, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.


