पणजी: भारतीय जनता पक्षांतर्गत राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील नाराजीच्या चर्चांवर भाष्य करताना भाजपचे ज्येष्ठ नेते दामोदर (दामू) नाईक यांनी पक्षात सलोखा असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्री सुभाष फळदेसाई हे आपले वैयक्तिक शत्रू नाहीत, आपण दोघेही चांगले मित्र आहोत, असा ठाम दावा त्यांनी केला आहे. समाजासाठी आणि पक्षासाठी काम करताना अंतर्गत मते-मतांतरे असू शकतात, परंतु भाजपला पुढे नेण्यासाठी सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणे हेच आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या प्रक्रियेवरून आणि उमेदवारीच्या मुद्यावरून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेबाबत बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, एसटी आरक्षणाची कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे. पक्षाचे स्थानिक आमदार व मंत्र्यांनी या प्रक्रियेचे पूर्ण स्वागत केले असून, पक्ष घोषित करेल त्या अधिकृत उमेदवारासाठी प्रामाणिकपणे आणि जीवाची बाजी लावून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ असणारा कोणताही खरा कार्यकर्ता अचानक उचकून जाणारा नसतो, तर तो ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिस्तीचे पालन करतो असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान आज सकाळी सांगेमध्ये फळदेसाई यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जात दामू नाईकांनी काल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
यावर पक्षातील शिस्त आणि कार्यकर्त्यांचे मतभेद दूर करण्याच्या प्रयत्नांविषयी सांगताना दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत एक विशेष बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता असून, त्यामध्ये आमनेसामने बसून सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. भाजप हा केवळ एका व्यक्तीचा नसून संघटित विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील कोणतीही अडचण किंवा मतभेद आपापसात चर्चा करून सोडवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा दाखला देत दामू नाईक यांनी भाजपच्या उभारणीतील जुन्या नेत्यांच्या त्यागाचे स्मरण करून दिले. गोव्यात भाजप पक्ष उभारताना देशाचे माजी संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याग केलेला आहे. त्या संघर्षातूनच आजचा भाजप आकाराला आला. त्या सर्वांची कदर आम्हाला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले.


