पणजी : गोव्यातील अनुसूचित जमाती (ST) समाजाचा राजकीय आरक्षणाचा लढा हा कोणाकडे सहानुभूती मागण्यासाठी नसून, घटनेने दिलेल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी आहे, असा पुनरुच्चार आमदार तथा युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) चे नेते गोविंद गावडे यांनी केला. 'उटा'च्या कार्यकर्त्यांनी कटमगाळ दादाचे दर्शन घेऊन एसटी आरक्षणाची उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी चळवळीच्या पुढील टप्प्याचा श्रीगणेशा केला.
गोव्यात अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण मिळावे यासाठीचा लढा गेल्या २३ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. २३ वर्षांपूर्वी ज्या कटमगाळच्या प्रांगणातून या ऐतिहासिक चळवळीची सुरुवात झाली होती, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र येत 'युटा'च्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आरक्षणाची ही मागणी पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प केला असे गावडे म्हणाले.
१३ ऑगस्ट २०२५ रोजी संसदेत आणि राष्ट्रपतींकडून या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतरही पुढील नोटिफिकेशन सुमारे एक वर्ष पेंडिंग होते. या काळात 'उटा' संघटनेने गावांतील वाड्यांमध्ये जाऊन मोठी जनजागृती केली आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले, अखेर हे नोटिफिकेशन जारी झाले आहे. एसटी आरक्षणाच्या या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गोविंद गावडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कायदा व न्याय मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
आरक्षणाशी संबंधित असलेली पुढील सर्व तांत्रिक प्रक्रिया येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले. ही तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा व्हावा, असा ठाम विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.


