मडगाव : आमदार नीलेश काब्राल यांनी मागील तीन कार्यकाळात कुडचडे मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम केले आहे. मात्र, आगामी काळात पक्षाने त्यांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला किंवा त्यांना उमेदवारी नाकारली, तर कुडचडेतून भाजपच्या तिकीटावर आपण १०० टक्के दावा ठोकणार, असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांनी स्पष्ट केले.
कुडचडेतील सद्य राजकीय स्थितीवर भाष्य
कुडचडे मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर बोलताना सिद्धार्थ गावस देसाई यांनी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, आमदार नीलेश काब्राल हे सलग तीन टर्म भाजपचे आमदार म्हणून मतदारसंघात सक्रिय असून त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. अजून निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. तसेच पक्षाकडून उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच कोणाला पाठिंबा जाहीर करणे योग्य ठरणार नाही.
पक्षांतर्गत एकतेवर भर
कुडचडेतील राजकीय वातावरण बिघडू नये आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्र राहावेत, या हेतूने आपण कोणतेही वादग्रस्त विधान करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, मी २००७ ते २०१२ या काळात पंच आणि सरपंच म्हणून काम केले आहे. त्यानंतर २०२० पासून जिल्हा पंचायत सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. जर नीलेश काब्राल यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला, तर त्या ठिकाणी भाजपच्या तिकीटावर माझा दावा नक्कीच असेल.


