गुवाहाटी : आसाममध्ये पुराची स्थिती अद्याप गंभीर असून, यंदाच्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९८ वर पोहोचली आहे. शनिवारी चाराईदेव जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला. राज्यातील १३ जिल्ह्यांमधील १ लाख ५५ हजार ८४९ नागरिक अद्याप पुरामुळे प्रभावित आहेत. (Assam flood death toll reaches 98, over 1.55 lakh remain affected in 13 districts).
एक दिवस आधी १५ जिल्ह्यांतील १.६८ लाखांहून अधिक नागरिक पुराच्या तडाख्यात होते. शनिवारी प्रभावित जिल्ह्यांची संख्या १३ वर आली असली, तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. गोलाघाट जिल्ह्यात सर्वाधिक ५८,७५० नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यापाठोपाठ शिवसागरमध्ये ४८,२८६ आणि जोरहाटमध्ये २५,२५९ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
चार जिल्ह्यांत घराघरात सर्वेक्षण
पूरग्रस्त भागातील कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक निधी लवकर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून ९ ऑगस्टपासून ३० ऑगस्टपर्यंत जोरहाट, शिवसागर, गोलाघाट आणि चाराईदेव या चार जिल्ह्यांमध्ये घराघरात जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या सर्वेक्षणातून एकही पूरग्रस्त कुटुंब वंचित राहणार नसल्याचे सांगितले. तसेच सरकारी नियमांनुसार जास्तीतजास्त मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर संबंधित कुटुंबांकडून माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे.
सप्टेंबरपर्यंत पुनर्वसनासाठी निधीचा अंदाज
सरकार १० सप्टेंबरपर्यंत पुनर्वसनासाठी आवश्यक निधीचा अंदाज निश्चित करणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली जाईल, असे सरमा यांनी सांगितले.
५५ मदत छावण्या; १० हजार नागरिक आश्रयाला
दरम्यान, प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी ५५ मदत छावण्या सुरू केल्या , त्यामध्ये १० हजारांहून अधिक विस्थापित नागरिक आश्रयाला आहेत. याशिवाय १८ मदत वितरण केंद्रे कार्यरत आहेत.
१०,७४८ हेक्टर शेतीचे नुकसान
पुराच्या पाण्यामुळे राज्यातील १०,७४८.६४ हेक्टर शेती क्षेत्र जलमय झाले आहे. ४७ हजारांहून अधिक जनावरांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात तातडीच्या मदतीसोबतच शेती आणि पशुधनाच्या नुकसानीची भरपाई व कायमस्वरूपी पुनर्वसनाचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.


