केपे : बक्षीसा दाखल मोठ्या प्रमाणात ‘लक्झरी’ कारचा समावेश असलेल्या केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसाद पावती मिळवण्यासाठी सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे. आज शनिवारी पहाटे ३ वाजल्यापासूनच नागरिकांनी पावती मिळवण्यासाठी रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे केपे रस्त्यावर लोकांची मोठी रांग लागली.
केपे न्यायालय ते बोरीमळ क्रीडा संकुलपासून नागरिकांची लांबच लांब रांग लागली होती. पहाटेच्या वेळेची पर्वा न करता भाविक आणि पावती घेण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहिलेले दिसत होते.
केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची महाप्रसाद पावती मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी रांग लागते. काहीजण रांगेत राहून महाप्रसाद पावती बूक घेऊन विक्री करतात तर काहीजण बक्षीसे लागणार या अपेक्षेने पावती बूक खरेदी करून स्वत:कडेच ठेवतात. बक्षीसाच्या रुपात मोठ्या प्रमाणात लक्झरी कार ठेवल्या जात असल्याने; येथील महाप्रसाद पावती कुपानाची क्रेझ गोवाभर आहे.
आणि गोवाभरातून लोक याठिकाणी महाप्रसाद पावती घेण्यासाठी गर्दी करतात. महाप्रसाद पावती कूपानांचे वितरण करण्याच्या काही दिवसांपूर्वी याठिकाणी केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत रक्तदान शिबिरही आयोजित केले जाते. त्यालाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.


