मडगाव: रानभाजी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असूनही तिच्या सेवनाकडे अजूनही समाजाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे समाजाचा रानभाज्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे. प्रत्येकाने रानभाजीचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केले.
मडगाव येथील रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी महोत्सवाच्या’ उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे, आमदार उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई आणि सविता तवडकर यांच्यासह कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोमंतकीय संस्कृती आणि निसर्ग वारशाची जपणूक
कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, राजकीय कारकीर्द घडवत असतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड मंत्री तवडकर यांच्या कार्यातून दिसते. त्यांनी खऱ्या ‘गोयकारपणाची’ ओळख जपली आहे. लोकोत्सवासारख्या संकल्पनांतून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आपल्या संस्कृतीतील हरवत चाललेला रानभाज्यांचा वारसा आपण जपला पाहिजे. निसर्गाने दिलेल्या या भाज्यांच्या सेवनाने अनेक आजार दूर राहतात. हा उपक्रम प्रत्येक घराच्या किचन गार्डनपर्यंत पोहोचला पाहिजे.
पणजीतही महोत्सव आयोजित करण्याची मागणी
गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे म्हणाल्या की, रानभाज्यांसारखा महोत्सव शहरात आयोजित करून तो यशस्वी करण्याचे श्रेय मंत्री तवडकर यांना जाते. शहरांतील लोकांनाही आता रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजू लागले आहे. लोकोत्सवाप्रमाणे राज्यभरात असे कार्यक्रम व्हावेत आणि असा रानभाजी महोत्सव पणजी शहरातही आयोजित केला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले की, मंत्री तवडकर हे लोकोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपतात आणि ‘श्रमधाम’ उपक्रमातून बेघरांना घरे बांधून देतात. आता रानभाज्यांची ओळख शहरी भागातील लोकांना करून देऊन ही निसर्ग परंपरा जपण्याचे काम ते करत आहेत.

रानभाज्या विक्रीसाठी लवकरच आउटलेट्स
आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री रमेश तवडकर म्हणाले, मडगाव शहरात या महोत्सवाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आमचा निर्णय योग्य ठरल्याचे सिद्ध झाले आहे. शहरांतील लोकांना रानभाज्यांची आणि त्यापासून बनणाऱ्या विविध पारंपरिक पदार्थांची ओळख यातून होत आहे. भविष्यात रानभाज्यांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी लवकरच स्वतंत्र आउटलेट्स सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

शेवटी बोलताना मंत्री दिगंबर कामत म्हणाले, गणेश चतुर्थीच्या वेळी माटोळीचे साहित्य एकत्र करताना किंवा अळंबी मिळाल्यावरच आपल्याला रानाची आठवण येते. मात्र, नेहमीच्या आहारात रानभाज्या खाण्याकडे आपला दृष्टिकोन अजून बदललेला नाही. महिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच या भाज्या खाण्याची सवय लावली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात किमान चार ते पाच प्रकारच्या रानभाज्यांचा वापर व्हावा आणि त्यांचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.


