मडगावात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टिकर; पोलिसांकडून चौकशी सुरू

‘मोदी ने मरवा दिया’ असा संदेश लिहिलेला व रायफलचे चिन्ह असलेला स्टिकर मडगावातील पेट्रोलपंपावर चिकटवलेला आढळला. कर्मचाऱ्यांनी हा स्टिकर नंतर काढला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
07th August, 05:34 pm
मडगावात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टिकर; पोलिसांकडून चौकशी सुरू

मडगाव: येथील गोमंत विद्या निकेतनच्या समोर असलेल्या एका पेट्रोलपंपावरील खांबावर शुक्रवारी (०७ ऑगस्ट) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक आक्षेपार्ह स्टिकर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या स्टिकरवर ‘मोदी ने मरवा दिया’ असा संदेश लिहिलेला असून त्याखाली रायफलचे चिन्ह छापण्यात आले असल्याने हा विषय अत्यंत वादग्रस्त ठरला आहे.

गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी

या आक्षेपार्ह स्टिकरबाबत माहिती मिळताच मडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे अन्वेषण विभाग (CID) तसेच इतर गुप्तचर यंत्रणांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी सदर स्टिकर खांबावरून काढून टाकला.

रात्रीच्या वेळी कृत्य केल्याचा संशय

हा स्टिकर नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने लावला, याबाबत पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती नाही. गुरुवारी रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने संधी साधून हा स्टिकर चिकटवला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मडगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चौकशी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा