पणजीः गोवा डेअरी मधील गलथान कारभारामुळे बरेच शेतकरी गोवा डेअरी सोडून सुमूलला दूध पुरवठा करीत आहेत. त्यासाठी गोवा डेअरी वाचवायची असेल तर राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या ताब्यात द्यावी. तसेच गोवा डेअरीच्या अपात्र संचालकाविरुद्ध आर्थिक नुकसान भरपाईचा आदेश जारी केला आहे. त्या आदेशावर कारवाई करून नुकसान भरून काढावे, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे.
पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दूध उत्पादकांनी ही मागणी केली. यावेळी दूध उत्पादक शिवानंद बाक्रे, योगेश गोवेकर आणि अनंत मळीक उपस्थित होते. या विषयी बोलताना अनंत मळीक यांनी सांगितले की, सुमूल डेअरीने दुधाच्या किंमतीत सुधारणा करण्याचे आश्वासन देऊन या विषयी लेखी हमी सुद्धा दिली आहे.
त्यांच्या निवडणुका सुरू असल्या कारणाने त्यावेळी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता त्यांच्या निवडणुका संपल्या आणि नव्या चेअरमनची निवड झाल्यानंतर १ एप्रिलपासून सरकारबरोबर सुमूलची दरवाढ लागू होणार, असे मळीक यांनी सांगितले.
सुरवातीला सर्व शेतकरी गोवा डेअरीला दूध पुरवत होते. पण त्यांचा कारभार व्यवस्थित नव्हता. दूध एकत्र करण्यात आणि दर निश्चित करण्यात नेहमीच घोळ असायचा. त्यासाठी नेहमीच नुकसानीत चालत होती. ही डेअरी सुधारण्याचे प्रयत्न झाले. पण गोवा डेअरीचे जे मंडळ येत होते, तेच कारभार करीत होते. त्यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सुमूल आणल्यानंतर जास्त असे शेतकरी सुमूलकडे ओढले गेले, असे मळीक यांनी सांगितले.
पण गोवा डेअरी ही गोमंतकीयांची डेअरी. या डेअरीचा कारभार सुधारायचा असेल तर सरकारने ती ५ वर्षांसाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाला चालवायला द्यावी, जेणेकरून ती वाचणार. पूर्ण देशभरात या मंडळाने अनेक डेअरी आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणून त्यांना उभारी दिली असल्याचे मळीक म्हणाले.
भ्रष्टाराचे आरोप असलेल्या गोवा डेअरीच्या संचालकाला अपात्र ठरवून त्यांच्याकडून आर्थिक भरपाई करून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पण सध्या या आदेशाची स्थिती काय आहे ती कुणालाच माहिती नाही, अशी तक्रार योगेश गोवेकर यांनी केली.
त्यासाठी सरकारने अपात्र ठरवलेल्या संचालकांची चौकशी करून त्यांच्याकडून आर्थिक भरपाई प्रक्रिया सुरू करावी. या संचालकांमुळे गोवा डेअरी नुकसानीत गेली आहे. या संचालकांवर कारवाई करून ही डेअरी पाच वर्षांसाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाला चालवायला द्यावी. नाही तर अपात्र झालेल्या संचालकांचे प्रोक्सी परत मंडळावर येऊन भ्रष्ट कारभार करणार, असे गोवेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार
दरम्यान, शिवानंद बाक्रे यांनी गाईच्या दुधाचे दर ६ रुपयांपर्यंत आणि म्हशीच्या दुधाचे दर १० रुपयांपर्यंत वाढवल्याने, तसेच गाय आणि म्हैस खरेदी करण्यासाठीची मर्यादा ७० हजारांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढवल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.

