निवडणुकीत विरोधकांच्या महायुतीसाठी ‘गोंय प्रथम’ करणार मध्यस्थी

पक्षफोड करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
53 mins ago
निवडणुकीत विरोधकांच्या महायुतीसाठी ‘गोंय प्रथम’ करणार मध्यस्थी

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात महायुती करावी, यासाठी ‘गोंय प्रथम’ या व्यासपीठामार्फत गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, तसेच पक्षफोड करून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना विरोधी पक्षांनी उमेदवारी देऊ नये, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘गोंय प्रथम’ने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांचे निवेदन चार प्रमुख विरोधी पक्षांना पाठवले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत स्वप्नेश शेर्लेकर, अँथनी डिसिल्वा, मारियान रिबेलो, शंकर पोळजी, राजदीप नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षांनी मोठा-लहान भाऊ असा वाद बाजूला ठेवून युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही डिसिल्वा यांनी केले. युती न झाल्यास त्याची जबाबदारी मोठ्या पक्षांवर असेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पक्षफोड करून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना विरोधी पक्षांनी पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. भाजपकडून तिकीट न मिळाल्यास हे आमदार पुन्हा विरोधी पक्षांत येण्याचा प्रयत्न करू शकतात. अशावेळी त्यांना पक्षात प्रवेश किंवा उमेदवारी देऊ नये, अशी सूचना राजदीप नाईक यांनी केली.

विरोधी पक्षांनी परिपक्वता, प्रामाणिकपणा आणि एकात्मता दाखवून राज्यहितासाठी एकत्र यावे. या मागण्यांसह चारही विरोधी पक्षांच्या नेत्यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती स्वप्नेश शेर्लेकर यांनी दिली.

प्रभावी विरोधी आघाडी उभी राहणे गरजेचे

भाजप सरकारला सत्तेबाहेर करण्यासाठी राज्यात प्रभावी विरोधी आघाडी उभी राहणे गरजेचे असल्याचे अँथनी डिसिल्वा यांनी सांगितले. आकडेवारीनुसार सुमारे ६७ टक्के गोवेकर भाजपविरोधी असल्याचा दावा करत, या मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपला केवळ ३३ टक्के मतांवर सत्ता स्थापन करता आली, असे ते म्हणाले. त्यामुळे भाजपविरोधी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘गोंय प्रथम’ करत असून, विरोधी पक्षांची एकजूट हीच संघटनेची पहिली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा