पणजी : गावातील कोणतीही जमीन, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्ता गावाबाहेरील व्यक्ती अथवा संस्थेला विक्री न करण्याचा ठराव अडवई- सत्तरी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयावर दै. ‘गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या विशेष उपक्रमांतर्गत वाचकांची मते मागवली. विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत असून, इतर गावांनीही अडवईच्या या निर्णयाचा आदर्श घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
अडवई सत्तरी ग्रामसभेचा हा निर्णय गावाच्या अस्मितेचे आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणारा ऐतिहासिक निर्णय आहे. इतर गावांनीही यापासून प्रेरणा घ्यावी.
मारुती हरमलकर
जमीन ही केवळ मालमत्ता नसून गावाची ओळख आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी ती जपण्याचा हा दूरदृष्टीचा निर्णय योग्यच आहे. हा निर्णय लोकांच्या एकजुटीमुळे झाला आहे. सर्वांनी आता जमीन गावाबाहेरील लोकांना विक्री न करण्याचा संकल्प केला पाहिजे.
बाबणी परब
ग्रामसभेचा हा निर्णय योग्यच आहे. या गावापासू्न प्रेरणा घेऊन अन्य गावांनीही याचे अनुकरण करावे.
रुद्र नाईक
हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. खूप उशिरा हा निर्णय घेतला आहे. याचे अनुकरण इतर गावांनीही करावे.
ऐश्वर्या काळसेकर
गावातील एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रामस्थांनी एकमताने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.

मोहन पालयेकर
गावाची संस्कृती, परंपरा आणि स्थानिक जीवनशैली जपण्यासाठी ग्रामसभेने घेतलेला हा निर्णय आदर्शवत असून त्याचे स्वागत केले पाहिजे.

प्रभा सावंत
अडवई ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. मात्र, इतर गावांतील लोकांना कधी कळणार?
आशीर्वाद मणेरीकर
जमिनीच्या अनियंत्रित विक्रीमुळे होणारे सामाजिक आणि पर्यावरणीय बदल रोखण्यासाठी अडवई सत्तरीने योग्य वेळी योग्य पाऊल उचलले आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो.

आनंद नाईक
आज अनेक गावे बाहेरील गुंतवणुकीमुळे आपली मूळ ओळख गमावत आहेत. अडवई सत्तरीने त्याविरुद्ध एक सकारात्मक आणि धाडसी भूमिका घेतली आहे. परप्रांतिय लोक गोव्यातील जमिनी विकत घेत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
गोपी नाईक
ग्रामसभेच्या लोकशाही प्रक्रियेतून सर्वानुमते घेतलेला हा निर्णय गावकऱ्यांच्या एकजुटीची आणि गावावरील प्रेमाची साक्ष देतो.
उषा नागवेकर
अडवई सत्तरीचा हा ठराव केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण गोव्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक गावाने आपल्या वारशाच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजनांचा विचार करावा. लोकांनी आता एकजूट होऊन लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिनेश भगत
ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने सर्वानुमते घेतलेला हा निर्णय गावकऱ्यांची गावाविषयीची बांधिलकी आणि जबाबदारी अधोरेखित करतो. अशा निर्णयांमुळे गावांचा शाश्वत विकास आणि स्वाभिमान अधिक बळकट होईल.
महेश घाटवळ
आज अनेक गावांमध्ये अनियंत्रित बाह्य गुंतवणुकीमुळे स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. गावातील जमीन आणि मालमत्ता स्थानिकांच्या मालकीत राहिल्यास गावाचा सामाजिक समतोल, एकोप्याची भावना आणि स्थानिकांचे हक्क अधिक मजबूत होतील. ग्रामसभेच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत.
सुधाकर गावकर


