वेळसांव येथे दुपदरी रेलमार्गाचे काम पुन्हा सुरू

२० घरांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची भीती

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
39 mins ago
वेळसांव येथे दुपदरी रेलमार्गाचे काम पुन्हा सुरू

वास्को : वेळसांव येथे रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल)ने दुपदरी रेलमार्गाचे काम पुन्हा सुरू केल्याने परिसरातील सुमारे २० घरांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, या जागेसंदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असतानाच आरव्हीएनएलने काम पुन्हा सुरू केल्याबद्दल स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वेळसांव येथे दुपदरी रेलमार्ग प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, काही रहिवाशांविरोधात मोडतोडीचे गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. संबंधित जागा रेल्वेची असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत असले, तरी त्या दाव्याला पुष्टी देणारी मालकी हक्काची कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेल्वेने संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी अनेकदा करण्यात आली; मात्र कागदपत्रे सादर करण्याऐवजी रेल्वे प्रशासन काम पुढे नेत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

आरव्हीएनएलने आता दुपदरी रेलमार्गासाठी संबंधित ठिकाणी माती व खडी टाकण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या जागेवर खडी टाकण्यात आली आहे, त्या मार्गाचा वापर परिसरातील सुमारे २० घरांतील नागरिक गेली अनेक वर्षे ये-जा करण्यासाठी करीत आहेत. वाहनांची वाहतूक तसेच रुग्णवाहिकेसह आपत्कालीन सेवांसाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खडी टाकल्यानंतर या मार्गावरून साधी सायकल नेणेही कठीण झाले आहे. नवीन रेल्वेमार्गाच्या कामामुळे या २० घरांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असून, त्यामुळे घरांपर्यंत वाहने पोहोचू शकणार नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेलाही प्रवेश मिळणार नसल्याने वृद्ध किंवा आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेणे मोठे आव्हान ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.आरव्हीएनएलकडून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी त्यावर आमचा विश्वास नसल्याचेही दोरादो यांनी स्पष्ट केले. जर संबंधित जागा रेल्वेचीच असेल, तर कामासाठी गोवा पोलिसांची मदत घेण्याऐवजी रेल्वे संरक्षण दलाची मदत का घेण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नवीन रेल्वेमार्गामुळे पायी चालण्यासाठीही जागा उरणार नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते ओलेंसियो सिमोईस यांनीही या कामामुळे स्थानिकांची पारंपरिक वाट बंद होण्याची भीती व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांविरोधात आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक रहिवासी कार्वालो यांनी सांगितले की, रस्ता बंद झाल्यास आमच्या घरातील वृद्धांना रुग्णालयात कसे नेणार, हा आमच्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

रेल्वेचे काम बेकायदेशीर : ओर्विल दोरादो 

सामाजिक कार्यकर्ते ओर्विल दोरादो यांनी आरव्हीएनएलचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत रेल्वेकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसून, हा विषय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही आरव्हीएनएलने पुन्हा काम सुरू केल्याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सुमारे २० घरांचा पारंपरिक रस्ता बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला.


हेही वाचा
सर्व पहा