पणजी : सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाद्वारे नगरपालिका आणि ग्राम पंचायत निवडणुकीत आरक्षण ठरवण्यासाठी ट्रिपल टेस्ट करण्याचा आदेश दिला होता. यानुसार आयोगाची नियुक्ती करणे, प्रभाग निहाय मागासवर्गीय व एससी, एसटी समाजाचे सर्वेक्षण करणे, यानुसार प्रभाग रचना करणे आवश्यक आहे. येणाऱ्या नगरपालिका मतदानापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी काँग्रेस ओबीसी विभागाचे शरद चोपडेकर यांनी केली. याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.
चोपडेकर यांनी सांगितले की, नगरपालिका पंचायत निवडणुकांपूर्वी ट्रिपल टेस्ट करण्यात यावी अशी मागणी आम्ही सहा महिन्यापूर्वी केली होती. याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देखील दिले होते. मात्र याबाबत आम्हाला अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यामुळे आम्ही आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आम्हाला या निवडणुका त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगितले आहे. मात्र आम्ही दिलेले निवेदन राज्य निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्ट नियमावलीचे पालन करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. प्रभाग रचनेस पुरेसा वेळ नाही म्हणून नगरपालिकांवर प्रशासक नेमण्यात आले. हा विकेंद्रीकरणाच्या अधिकारावर घाला आहे. यामुळे ओबीसी समाजाला त्यांच्या संविधानात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आयोग नेमणे , सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणानंतर ओबीसी समाजाच्या टक्केवारीनुसार आरक्षण दिले गेले पाहिजे.


