पणजी: गोव्याच्या राजकीय पटलावर आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच, सध्या विविध मततारसंघांत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, त्यांचे पुत्र पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि त्यांचे पीए आग्नेल डिकुन्हाही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बाबूश पणजीतून, पुत्र रोहित ताळगाव तर पीए आग्नेल डिकुन्हा सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
बाबूश मोन्सेरात पणजी मतदारसंघातून निवडून आल्यानंतर विद्यमान भाजप सरकारात महसूलमंत्री आहेत. ताळगावच्या आमदार तथा माजी महसूलमंत्री तथा बाबूश यांच्या पत्नी जेनिफर यांचे नुकतेच निधन झाल्याने ताळगाव मतदारसंघ सध्या आमदाराविना आहे. या मतदारसंघात त्यांचे पुत्र रोहित लढण्यास इच्छुक आहेत. सांताक्रुझ मतदारसंघातून आपले पीए आग्नेल यांना उतरवण्यास बाबूश इच्छुक आहेत.
त्यानुसार त्यांनी तयारीही सुरू केली आहे. सांताक्रूझ मतदासंघात सध्या भाजपचेच आमदार आहेत. कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार रुडॉल्फ या मतदारसंघात नेटाने काम करीत आहेत. पुन्हा एकदा या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यात ते इच्छुक आहेत. त्यातच बाबूश यांनी आपल्या पीएला पुढे केल्याने; या मतदारसंघात सध्या धुसफूस सुरू आहे.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली तीव्र इच्छा असल्याचे रोहित मोन्सेरात यांनी स्पष्ट केले आहे. आपली दिवंगत आई आणि ताळगावच्या माजी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी या भागात उभा केलेला विकासकामांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे चालू ठेवणे हाच या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ताळगावच्या जनतेशी मोन्सेरात कुटुंबाचे अनेक वर्षांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्या कार्यकाळात ताळगावमध्ये भुयारी गटार योजना, रस्ते आणि इतर अनेक मूलभूत पायाभूत सुविधांची कामे सुरू केली होती. त्यापैकी काही प्रलंबित आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून ताळगावचा सर्वसमावेशक विकास साधायचा आहे, असे रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.


