कोकणीत लेखन हेच आयुष्यातील टर्निंग पॉईंट : महाबळेश्वर सैल

डॉ. प्रकाश पर्येकर लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
04th August, 11:29 pm
कोकणीत लेखन हेच आयुष्यातील टर्निंग पॉईंट : महाबळेश्वर सैल

पणजी : कोकणी भाषेत लेखन करण्याचा निर्णय हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. ज्येष्ठ साहित्यिक दामोदर (भाई) मावजो यांची भेट झाल्यानंतर कोकणीतही दर्जेदार साहित्य निर्माण होत असल्याची जाणीव झाली आणि त्यानंतर आपण कोकणीत लेखन सुरू केले, असे सरस्वती सन्मान प्राप्त लेखक महाबळेश्वर सैल यांनी सांगितले.

डॉ. प्रकाश पर्येकर लिखित ‘महाबळेश्वर सैल यांच्या कादंबऱ्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन’ आणि ‘शब्दयोगी महाबळेश्वर सैल’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद लोलयेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भूषण भावे, प्रकाश वजरीकर आणि डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित होते.

सैल म्हणाले की, सुरुवातीला मी मराठीत लेखन करत होते. मात्र, कोकणीत लेखन करण्याचा निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारी बदल ठरला. तीन वर्षे त्यांनी शेतीत काम केले. त्यानंतर सैन्यात भरती झाले. १९७२ मध्ये बांबोळी कॅम्पमध्ये नियुक्ती असताना त्यांची बदली पुण्यात झाली. पुण्यातील वास्तव्यात मोठ्या प्रमाणावर वाचन केल्यामुळे आपल्या आत दडलेला लेखक त्यांना सापडला आणि लेखक होण्याचा निर्धार त्यांनी केला.

पुणे नगर वाचन मंदिराबाहेर लावलेल्या जाहिरातीत आचार्य अत्रे यांनी सुरू केलेल्या मराठा दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी कथा स्पर्धेची माहिती त्यांनी वाचली. लेखनाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी एक लघुकथा पाठवली. त्या कथेची निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, त्या काळात मातृभाषा कोकणीमध्ये लेखन करण्याचा विचार त्यांच्या मनात नव्हता. कोकणीतील अनुभवांचे मराठीत भाषांतर करताना त्यातील मौलिकता हरवत असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी काही काळ लेखन थांबवले. पुढे सांगे येथे पोस्टमास्तर म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची माजोर्डा येथे बदली झाली. त्यावेळी दामोदर (भाई) मावजो यांच्याविषयी ऐकून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली.

भाई मावजो यांनी त्यांना ‘घट्टण’ आणि ‘जागरण’ ही पुस्तके वाचण्यासाठी दिली. ती वाचल्यानंतर कोकणीतही उत्कृष्ट साहित्य निर्माण होत असल्याची खात्री पटली आणि कोकणीत लेखन सुरू केले. मातृभाषेसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि भित या कादंबरीने आपल्या अनुभवांना योग्य न्याय दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘सैल हे कोकणी साहित्यातील महाबळेश्वर’ : लोलयेकर

शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर म्हणाले की, महाबळेश्वर सैल यांनी आपल्या साहित्यातून स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. त्यांनी प्रांत आणि भाषेच्या सीमा ओलांडत आपले साहित्य देशभर तसेच परदेशातही पोहोचवले. कोकणी साहित्यातील ते खऱ्या अर्थाने ‘महाबळेश्वर’ आहेत. डॉ. प्रकाश पर्येकर यांनी सैल यांच्या साहित्याची केवळ समीक्षा न करता त्याचे समाजशास्त्रीय मूल्यमापन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा