दोडामार्ग : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले आणि ओहोळांना पूर आला असून अनेक लहान-मोठे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे विविध गावांचा संपर्क तुटला असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारनंतर अधिक जोर धरला. सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले, तर गटारे तुडुंब भरल्याने पाणी रस्त्यांवर साचले. दोडामार्ग शहरातील मुख्य राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील राज्यमार्गही पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागले. घोटगेवाडी, परमे, कुडासे आदी भागांतील कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळासाठी खंडित झाला.
तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ८५.५० टक्क्यांवर पोहोचला असून धरणातून सुमारे ३१२.०६ घ.मी./से. वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तेरवण-मेढे उन्नयी बंधाऱ्यातून ६३.२२घ.मी./से. पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी तिलारी नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
फळबागा, शेती पाण्याखाली
तिलारी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून ती इशारा पातळी समीप पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून फळबागा आणि शेतीचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.


