कळंगुटमध्ये दारूच्या नशेत हाणामारी; जखमीचा मृत्यू

पोलिसांकडून खुनाच्या आरोपाखाली चार जणांना अटक

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
कळंगुटमध्ये दारूच्या नशेत हाणामारी; जखमीचा मृत्यू

म्हापसा : कळंगुट समुद्रकिनारी दारूच्या नशेत झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेख समीर (२९, मूळ रा. फरदापूर, महाराष्ट्र) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी खुनाचा आणि चोरीचा गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेमंड चार्ली होवसे उर्फ राम्बो (३६, रा. कांदोळी, मूळ झाशी, उत्तर प्रदेश), अर्जुन हनुप्पा नाईक (२२, रा. कळंगुट, मूळ गदग, कर्नाटक), मेहबर रशीद खान (६१, रा. कळंगुट, मूळ वाराणसी, उत्तर प्रदेश) आणि सलमान खान (३५, रा. सोलापूर, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. समीर आणि सर्व संशयित कळंगुट व कांदोळी परिसरातील शॅक व गेस्टहाऊसमध्ये काम करत होते.
१८ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजता कळंगुट समुद्रकिनारी हे सर्वजण पार्टीसाठी जमले होते. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत शेख समीर यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या समीर यांना प्रथम कांदोळी आरोग्य केंद्रात आणि नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) इस्पितळात दाखल करण्यात आले.
१९ जुलै रोजी समीर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी फरदापूर (महाराष्ट्र) येथे गेले. तेथे प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, ३० जुलै रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी रेमंड होवसे, अर्जुन नाईक आणि मेहबर खान या तिघांना अटक केली. म्हापसा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौथा संशयित सलमान खान याला ४ ऑगस्टच्या रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर करीत आहेत.
खून, चोरीचा गुन्हा दाखल
मयताचा लहान भाऊ शेख सोहेल यांनी ३ ऑगस्ट रोजी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली. संशयितांनी मारहाण करून आपल्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच घटनेवेळी त्याचा मोबाईल फोन व इतर वस्तू चोरल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(२), १०३(१) आणि ३(५) अन्वये खून व चोरीचा गुन्हा नोंदविला.

हेही वाचा
सर्व पहा