पणजी : बिटकॉइन मायनिंग ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवत सासष्टी तालुक्यातील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ३५.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे विभागाने मुंबईतील कृत्तिका वाघमारे (रा. विरार, मुंबई) या महिलेला अटक केली आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील ३० लाख रुपये तिच्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत मात्र संबंधित महिलाही अशाच ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराशी फेसबुक मेसेंजरवरून ‘ब्रायन बोन्स’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर हिल्डा नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे संवाद सुरू केला. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत बिटकॉइन मायनिंग ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत त्यांनी तक्रारदाराकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३५.५० लाख रुपये जमा करून घेतले.
संशयितांनी तक्रारदाराला unionfrontier.com या संकेतस्थळावर खाते उघडण्यास सांगितले. या संकेतस्थळावर गुंतवणुकीची रक्कम वाढत असल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणखी शुल्क भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे संशय आल्याने तक्रारदाराने संकेतस्थळाची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान फसवणुकीतील ३० लाख रुपये मुंबईतील एका बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर विभागाचे पथक मुंबईत रवाना झाले आणि विरार येथून कृत्तिका वाघमारे हिला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. चौकशीत तिनेही मुख्य सूत्रधारांनी आपली सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी
अटक केलेल्या कृत्तिका वाघमारे हिला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली असून, या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध सायबर विभागाकडून सुरू आहे.


