‘ऑपरेशन सायबर व्हिजिल’ मोहिमेअंतर्गत ७ संशयितांना अटक

गोवा पोलिसांची कारवाई : ११ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ४० ठिकाणी एकाच वेळी छापेमारी

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
02nd August, 11:51 pm
‘ऑपरेशन सायबर व्हिजिल’ मोहिमेअंतर्गत ७ संशयितांना अटक

पणजी : गोवा पोलिसांनी ‘ऑपरेशन सायबर व्हिजिल’ ही विशेष मोहीम राबवत ११ वेगवेगळ्या राज्यांतील ४० ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत ७ संशयितांना अटक करण्यात आली असून, २४ संशयितांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेद्वारे २ कोटी ५० लाख ६५ हजार ४०२ रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित ४० गुन्ह्यांचा तपास करण्यात आला.
राज्यात सायबर फसवणुकीत वाढ होत असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक केशव राम चौरसिया आणि उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गोवा सायबर पोलीस, उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या ४० सायबर फसवणूक प्रकरणांचा एकाचवेळी तपास करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून सुमारे २.५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
या मोहिमेसाठी ४० विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि आसाम या ११ राज्यांतील ४० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान ७ संशयितांना अटक करण्यात आली, तर २४ जणांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.
२१ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त; ३१३ म्युल खाती उघड
तपासादरम्यान पोलिसांनी २१ इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच बँक खात्यांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. याशिवाय सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेली ३१३ संशयास्पद ‘म्युल’ बँक खाती शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचा संशय असून, या आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास सुरू आहे.             

हेही वाचा
सर्व पहा