म्हापसा : गोव्यात गांजा तस्करीचे जाळे चालवणारा तसेच मार्ना-पिळर्ण दरोड्यातील फरार आरोपी कृष्णा बेळगावकर याला तेलंगणा अमलीपदार्थविरोधी ब्युरोने हैदराबाद येथे अटक केली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात गोवा व दिल्ली पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित आणखी चार संशयितांना अटक केली असून एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
१८ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेने हडफडे (बार्देश) येथे छापा टाकून केरळमधील अभिराम पुलिक्कल (२६) याला अटक केली होती. त्याच्याकडून मेथम्फेटामाइन आणि एमडीएमएसह सुमारे २.६५ लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याचे संबंध कोलवाळ कारागृहातील अझरीद्दीन आची उर्फ असारू याच्याशी असल्याचे समोर आले. पुढील तपासात असारूचे साथीदार मूसान मुखिरी आणि मोहम्मद फैझान (रा. केरळ) हे दिल्लीतून ड्रग्ज तस्करी करत असल्याचे उघड झाले.
गोवा पोलिसांच्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी ११ जुलै रोजी मोहम्मद फैझान आणि मूसान मुखिरी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ४० लाख रुपये किमतीचे १५१ ग्रॅम मेथम्फेटामाइन आणि ५१२ ग्रॅम मॅजिक मशरूम जप्त करण्यात आले.
गोव्यातील साथीदारालाही अटक
तपासात कृष्णा बेळगावकर हा संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून तो हैदराबादमधून ड्रग्ज तस्करीचे जाळे नियंत्रित करत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने वेरे (बार्देश) येथे छापा टाकून त्याचा साथीदार कालिचरण भोल याला अटक केली. त्याच्याकडून ८१२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
दरोडा, खून प्रकरणातही आरोपी
संशयित आरोपी कृष्णा बेळगावकर हा १७ मार्च २०२५ पासून फरार होता. मार्ना-पिळर्ण येथील पप्पू बिश्वास यांच्या घरावरील दरोडा, बालकासंबंधी कायद्यातील गुन्हा तसेच खून प्रकरणातही तो आरोपी आहे. पर्वरी पोलीस त्याला पुढील चौकशीसाठी हैदराबादहून ताब्यात घेणार आहेत.


